मोदींनी देशात चेष्टा चालवलीय! राहुल गांधी यांचा हल्ला

देशात महागाई व बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे, पण पंतप्रधान मोदी त्यावर कधीच बोलत नाहीत. कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह दिसत होते. नरेंद्र मोदी मात्र जनतेला टाळय़ा वाजवा, थाळय़ा वाजवा, मोबाईल टॉर्च लावा असे सांगत होते. कधी ते समुद्राच्या तळाला जातात आणि पूजा करतात, कधी सी प्लेनने हवेत जातात, मोदींनी देशाची चेष्टा चालवली आहे, अशी घाणाघाती टीका आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

भंडारा जिह्यातील साकोरी येथे राहुल गांधी यांची विदर्भातील काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी सभा झाली. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या नितींवर जोरदार टीका केली. कोरोनामध्ये हजारो माणसे मरत असताना थाळय़ा, टाळय़ा वाजवायला सांगितल्या. देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ होते, पण शेतकऱयांचे कर्ज का माफ होत नाही, असा सवाल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या धार्मिक मुद्दय़ावरही राहुल गांधी यांनी भाष्य केले. समुद्राखाली पूजा करतात, पण त्यावेळी त्यांच्यासोबत पुजारी नसतो. मोदी लष्करी अधिकाऱयांसोबत पूजेला बसलेले दिसतात. मग ते सी प्लेनने थेट हवेत जातात. मोदींनी एका प्रकारे ही सर्व थट्टा चालवली आहे.

जाहीरनामा म्हणजे जन की बात

काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने जाहीरनाम्यात महत्त्वाचे पाच मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करून बनवला आहे. बंद खोलीत बसून नव्हे तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा खऱया अर्थाने ‘जन की बात’ आहे.

अग्निवीर योजना रद्द करणार

अग्निवीर ही योजना लष्कराने नव्हे तर पंतप्रधान कार्यालयात तयार झाली आहे. आमचे सरकार आल्यावर पहिल्याच दिवशी अग्निवीर योजना रद्द करणार, अशी घोषणा राहुल गांधी यांनी यावेळी केली.

धमक्या देऊन विमानतळ अदानीच्या घशात

पूर्वी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ एका समूहाकडे होते. मात्र कालांतराने त्यांच्यावर सीबीआय चौकशी, धमक्या, दबाव आणून हा विमानतळ अदानी समूहाकडे सुपूर्त करण्यात आला. महाराष्ट्रातील सर्वात मोठे विमानतळ अदानी समूहाकडे जाते. हा प्रकार केवळ एका विमानतळापुरता मर्यादित नसून हे देशात सर्व क्षेत्रात झाले आहे.