मोदींचे मॅच फिक्सिंग आमच्या दोन खेळाडूंना जेलमध्ये टाकले; राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. तुम्ही मॅच फिक्सिंगबद्दल ऐकले असेलच. अंपायरवर दबाव टाकून, खेळाडू विकत घेऊन, कर्णधाराला धमकावून सामना जिंकला जातो, त्याला क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग म्हणतात. देशात लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचाची निवड केली असून सामना सुरू होण्यापूर्वी आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आले. अशाप्रकारे मोदी या निवडणुकीत मॅच फिक्सिंग करत आहेत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार घणाघात केला.

रामलीला मैदानावर आयोजित इंडिया आघाडीच्या महारॅलीत ते बोलत होते. भाजप सातत्याने 400 पारचा नारा देत आहे, पण, ईव्हीएम मॅनेज केल्याशिवाय, मॅच फिक्सिंग केल्याशिवाय आणि मीडिया- सोशल मीडिया विकत घेतल्याशिवाय भाजप 400 पार जाऊ शकत नाही, असे सांगतानाच यावेळी भाजप 180 चा आकडाही पार करू शकणार नाही, असा ठाम विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. मोदी सरकारने आयटी, ईडी, सीबीआयच्या आडून शिखंडी डाव टाकल्याचाही राहुल गांधी यांनी समाचार घेतला. काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती ब्लॉक केली गेली, आमच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. पैसे देऊन सरकारे पाडली जात आहेत. नेत्यांना तुरुंगात डांबले जात आहे, मोदी आणि देशातील तीन-चार अब्जाधीश मिळून हे मॅच फिक्सिंग करत आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

राज्यघटना संपवणेच भाजपचा उद्देश

गरीब जनतेच्या हातून देशाची राज्यघटना हिसकावून घेण्यासाठीच लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग केली जात आहे याकडे राहुल गांधी यांनी लक्ष वेधले. ज्या दिवशी राज्यघटना संपेल, त्या दिवशी देश टिकणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. ज्या दिवशी राज्यघटना संपेल त्या दिवशी स्वतंत्र राज्ये होतील, हाच भाजपचा उद्देश आहे, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला. संविधानाशिवाय एजन्सींच्या माध्यमातून धाक दाखवून देश चालवता येईल. आमचा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. पण, संविधान गेले तर गरीबांचे आरक्षण आणि पैसा जाईल, असेही राहुल गांधी म्हणाले.

देशात 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी

नोटबंदी आणि जीएसटीचा फायदा कोणत्या गरीबाला झाला, असा सवाल करतानाच, सध्या देशात 40 वर्षांतील सर्वाधिक बेरोजगारी वाढल्याचे राहुल गांधी म्हणाले. जातीय जनगणना, बेरोजगारी आणि शेतकऱयांना एमएसपी हे देशातील सर्वात मोठे प्रश्न आहेत. जनतेने पूर्ण ताकदीनिशी मतदान केले नाही तर मॅच फिक्सिंग यशस्वी होईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला. ही निवडणूक सामान्य नसून ही निवडणूक देश, राज्यघटना आणि गरीब तसेच शेतकऱयांचे हक्क वाचवणारी आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

संविधान आणि लोकशाहीवरील भाजपचा हल्ला परतवून लावा, शरद पवार यांची जनतेला साद

देशाचे संविधान व लोकशाहीवर भाजपकडून हल्ला सुरू आहे. हा हल्ला परतवून लावण्यासाठी सर्वांनी एकजुटीने आघाडी उघडण्याची गरज आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर या महारॅलीमध्ये हल्ला चढविला. पेंद्रीय तपास यंत्रणांचा बेछूटपणे वापर करून विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावले जात आहे. हा सगळा प्रकार देशाच्या राज्यघटनेवरच हल्ला आहे, अशी टीका त्यांनी केली. अरविंद केजरीवाल व हेमंत सोरेन या दोघांवरही राजकीय आकसाने कारवाई झाल्याचा आरोप शरद पवारांनी यावेळी केला.