
सामना प्रतिनिधी । राहुरी
वळण मांजरी रस्त्याच्या कडेला झाडाच्या झुडपात मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिलेचा गळा दाबुन झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात राहुरी पोलीस पथकाला यश आले आहे. श्रीरामपुर व संगमनेर येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या २४ तासात हा तपास लागल्याने राहुरी पोलीस प्रशासनाने सुटकेचा सुस्कारा सोडला आहे.
शुक्रवारी सकाळी राहुरी तालुक्यातील वळण शिवारात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली होती. या घटनेच्या तपासासाठी सहाय्यक पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, सोमनाथ वाकचौरे हे शुक्रवार पासुन राहुरीत ठाण मांडून होते. खुनाच्या घटनेतील महिलेची ओळख पटविण्यासाठी राहुरीच्या पुर्व भागातील तसेच नेवासा भागातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला गेला होता. तसेच सोशल मिडीयावर ओळख पटविण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडुन करण्यात आले होते. सोशल मिडीयाच्या माध्यमातून मयत महिला ज्योती राधाकिसन सातपुते वय ३५ राहणार मालदाडरोड संगमनेर ही असल्याची ओळख पटताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी पोलीस पथकाच्या मदतीने तपासाची चक्रे फिरविली.
या तपासकामी पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ, पोलीस नाईक गुलाब मोरे, कॉन्सटेबल निलेश पाटकर, महेश भंवर, अनिल पवार, रोहित येमुल, किरण बनसोडे, लक्ष्मण बोडखे, राठोड या निवडक पोलीस पथकाचा समावेश होता.
या घटनेत गणेश किशोर गोसावी वय २७ राहणार सुकेवाडी (संगमनेर) यास शनिवारी मध्यरात्री संगमनेर येथुन ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले आहे. आरोपीला जेरबंद करण्यासाठी संगमनेर विभागाचे पोलीस उपअधिक्षक अशोक थोरात यांची देखील मदत झाली.
गणेश व ज्योती हे दोघे आपआपल्या घरातुन गुरूवारी सकाळी बाहेर पडले होते. शिंगणापूर येथे देवदर्शन करून निघाल्या नंतर राहुरी तालुक्यातील वळण गावाजवळ येताच या दोघात वाद झाले. या वादातुन आपण ज्योतीचा गळा दाबून ठार मारल्याची कबुली गणेश याने दिल्याचे पोलीस सुत्राने सांगितले.
गवंडीकाम करणारा गणेश गोसावी हा विवाहित असुन त्याला २ मुली, १ मुलगा, पत्नी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर करत आहेत.

































































