
सामना प्रतिनिधी | मुंबई
रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱया वाहतूक उड्डाणपुलांच्या बांधणीवरून नेहमीच होणारे सीमावाद टाळण्यासाठी रेल्वेने हे काम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एमआरआयडीसी) लिमिटेडला देण्यात यावे असा प्रस्ताव पालिकेसमोर ठेवला आहे.
शहरातील वाहतुकीचे उड्डाणपूल रेल्वेच्या हद्दीतून जाताना रेल्वे त्यांच्या हद्दीतील पुलाचे डिझाईन आतापर्यंत स्वतः करीत आले आहे. त्यामुळे या पुलांच्या देखभाल-दुरुस्तीवरून कायम दोन यंत्रणांमध्ये वाद होत आले आहेत. पालिका, एमएमआरडीए वा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था या नेहमी रेल्वेवर डिझाईन वेळेवर न दिल्याचा आरोप करीत आले आहेत. त्यामुळे रेल्वेच्या ट्रकवरून शहरी पुलांचे डिझाईन तयार करण्यासाठी ‘एमआरआयडीसी’ला काम देण्यात यावे असा प्रस्ताव पालिकेला पाठविण्यात आल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले.
लोअर परळ पुलावरून धडा
लोअर परळ येथील उड्डाणपूल आयआयटीने धोकादायक ठरविल्याने पाडण्यात आला, मात्र हा पूल बांधायचा कोणी यावरून प्रचंड गोंधळ झाला. त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक घेण्यात येऊन सामोपचाराने मार्ग काढण्यात आला.
राज्यातील तब्बल 65 रेल्वे पूल बांधणार
महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना 8 ऑगस्ट 2017 रोजी राज्य आणि रेल्वे यांच्या संयुक्त सहभागातून झाली आहे. या महामंडळावर राज्यातील तब्बल 65 रेल्वे पुलांचे डिझाईन व प्रत्यक्ष उभारणी करण्याची जबाबदारी सोपविण्याचा प्रस्ताव आहे. अशा पुलांचा उतार शहरातून जात असल्याने तेथील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचे काम त्यामुळे रेल्वेवर न पडता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारवर पडेल असे एका अधिकाऱयाने स्पष्ट केले.





























































