विश्वचषकात पावसाचे धुमशान, थेट प्रसारण करणाऱ्या कंपनीचे दिवाळे निघणार!

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदाच्या 12व्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत 4 सामने हे पावसामुळे वाया गेले आहेत. यातील 3 सामन्यांमध्ये पावसामुळे एकही चेंडू फेकला गेला नाही, तर एक सामना रद्द करण्यात आला. यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमी आयसीसीच्या नियोजनावर टीका करत आहेत. मात्र या पावसाचा फटका, विश्वचषक क्रिकेट लढतीचे हिंदुस्थानात थेट प्रसारण करणाऱ्या स्टार इंडिया कंपनीलाही बसला आहे. प्रसारण क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 सामने रद्द झाल्यामुळे स्टार इंडिया कंपनीला किमान 100 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.

रविवारी मँचेस्टरच्या मैदानात हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यावरही पावसाचं सावट आहेच, स्थानिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी मँचेस्टरमध्ये पाऊस पडण्याची 60 टक्के शक्यता आहे. “इंग्लंडमधली परिस्थिती आता फारशी चांगली नाही आणि रविवारी हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर जाहीरातदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.” जाहीरात क्षेत्रातील एका नामवंत अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

जाहीरात करणाऱ्या कंपनीसाठी ही परिस्थिती मोठी पेचाची आहे. प्रसारणाचे हक्क घेतल्यामुळे त्यांना आयसीसीला पैसे देणं भाग आहे, मात्र सामना पावसामुळे रद्द झाला तर जाहीरातदार कंपनीला पैसे देणार नाहीत. त्यामुळे यामधून होणारा तोटा भरून काढण्यासाठी विमा हा एक पर्याय उरतो. मात्र विमा कंपनी, सर्व प्रक्रिया केल्याशिवाय पैसे देणार नाही. यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे. तांत्रिक कारणं देऊ विमा कंपन्या किमान 8 ते 10 टक्के रक्कम कापूनही देतात. निओ स्पोर्ट्स वाहिनीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश थवानी यांनी ही माहिती दिली. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान लढतीत पाऊस पडतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.