
>> डॉ. मंजिरी भालेराव
[email protected]
राजमाची किल्ल्याच्या पोटात लपलेले कोंडाणे, जिथे प्राचीन मुंबई-पुणे व्यापारी मार्गावरील शैलगृहसमूह आहे. आठ लेणी व एक मोठे पाण्याचे टाके असलेल्या या लयनसमूहातील सध्याचे पुरावशेष पाहता या लेण्यांचे प्राचीन काळातील महत्त्व लक्षात येते.
भारतात असलेल्या शैलगृहांपैकी जवळ जवळ 78 ते 80 टक्के शैलगृहे ही महाराष्ट्रात आहेत. त्याचप्रमाणे मुंबई ते पुणे या व्यापारी मार्गावरही बरेच शैलगृहसमूह कोरलेले दिसतात. काही ठिकाणची चैत्यगृहे ही देखणी आणि भव्य आहेत, तर काही ठिकाणी छोटेखानी चैत्यगृहे आहेत. काहींच्या मुखदर्शनावर सुरेख कोरीव नक्षीकाम आहे, तर काही अगदी साधी आहेत. यापैकी एक असलेले कोंडाणे नावाचे लहान पण महत्त्वाचे स्थळ राजमाची नावाच्या प्रसिद्ध किल्ल्याच्या पोटात लपलेले आहे. रायगड जिह्यातील कर्जतपासून सुमारे 13 कि.मी. अंतरावर असलेल्या कोंदीवडे या गावातून या ठिकाणी जाता येते.
इथे एकूण आठ लेणी आहेत आणि एक मोठे पाण्याचे टाके आहे. पावसाळ्यात इथे चैत्यगृहासमोर मोठा धबधबा असतो. याशिवाय अनेक लहान-मोठे धबधबे डोंगरातून वाहत असतात. या लेखमालेत पूर्वी आपण पाहिले होते की, अशा प्रकारच्या लेण्यांची निर्मिती ही फक्त वर्षाकाळात म्हणजे पावसाळ्यात राहण्यासाठी झाली होती. काळाच्या ओघात तिथे वर्षभर निवास करायला सुरुवात झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळातील लयनसमूहात फारशी टाकी दिसत नाहीत. कारण तिथे फक्त वर्षाकाळात निवास होत असे. त्या काळात भरपूर पाऊस आणि धबधबे असल्याने वेगळे पाण्याचे टाके चैत्यगृहाजवळ खोदत नसावेत.
सध्या कोंडाणे येथील चैत्यगृह आणि शेजारचा विहार हेच फक्त जरा चांगल्या अवस्थेत आहेत. या चैत्यगृहाचे मुखदर्शन संपूर्णपणे लाकडाचे होते. चैत्यगवाक्षातील लाकडी कमानी आजही शिल्लक आहेत, पण बाकीच्या विहारांची अवस्था खराब दगड आणि प्रचंड पावसामुळे आता चांगली नाहीये. चैत्यगृहातले खांब बरीच वर्षे तुटलेले होते, पण काही वर्षांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याने त्यांची डागडुजी केली आणि खालचा भाग नव्याने जोडला आहे. अतिशय सुबक आणि रेखीव शिल्पकाम हे या चैत्यगृहाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. ज्या डोंगरात हे चैत्यगृह कोरले आहे, त्या डोंगराच्या काही भागातला खडक अतिशय उत्तम प्रतीचा आहे. तिथूनच या चैत्यगृहाच्या कोरण्यास सुरुवात झाली. या उत्तम प्रतीच्या दगडामुळे चैत्यगृहाच्या मुखदर्शनाचा वरचा भाग अतिशय उत्तम अवस्थेत आहे. तिथे खूप सुरेख कमानी आणि इमारतींच्या छज्जाची प्रतिकृती वाटेल असे कोरीव काम केलेले आहे. छतावर तर चित्रं काढली होती हे दर्शवणारे अवशेषही शिल्लक आहेत. चैत्य गवाक्षाच्या बाजूला स्त्राr-पुरुषांची शिल्पं कोरली आहेत. ते शिल्पपटच आहेत, पण ते त्यात खेळत आहेत की नाच करत आहेत हे नेमके लक्षात येत नाही. परंतु हा दगड उत्तम प्रतीचा असल्याने आणि शिल्पे कोरणारे कारागीरसुद्धा कुशल असल्याने ही शिल्पे देखणी झाली आहेत.
जसे आपण चैत्यगृहाच्या आत प्रवेश करतो तसे आपल्याला दगडाचे खरे स्वरूप पाहायला मिळते. अनेक भेगा असलेला, पटकन तुकडे पडतील अशा प्रकारचा हा दगड असल्याने चैत्यगृहाच्या आत गेल्यावर उजव्या भिंतीचा मोठा भाग हा तुटलेला दिसतो. आज त्याच्यासमोर भिंत घालून तो भाग झाकून टाकला आहे. तुटलेले खांब दुरुस्त केले आहेत. इथला स्तूपसुद्धा खूप झिजला होता. हे पाहून असे लक्षात येते की, बाहेरून जरी दगड चांगल्या प्रतीचा दिसत असला तरी तो आतमध्ये खूपच खराब होता, पण जेवढे काम झाले होते ते पाहता आणि झालेल्या खर्चाचा विचार करता ते अर्धवट सोडता येत नव्हते. त्यामुळे ते चैत्यगृह तसेच पूर्ण केले. तिथे असलेल्या खांबांपैकी एकावर एक छोटासा स्तूप कोरला आहे.
चैत्यगृहाच्या बाहेरच्या बाजूच्या भिंतीवर एका शिल्पाचे अवशेष आहेत. त्याचा जेवढा भाग शिल्लक आहे त्यावरून हे अतिशय काळजीपूर्वक कोरलेले एका पुरुषाचे सुबक शिल्प होते. त्याची गुंतागुंतीची केशरचना बारकाईने कोरली आहे. जे आज शिल्लक आहे त्यावरून त्याचे कान सामान्य मानवापेक्षा वेगळे दाखवले आहेत हे लक्षात येते. ते पक्ष्यांच्या पंखांसारखे आहेत. अशा प्रकारचे कान असलेला द्वारपाल यक्ष आपण पितळखोरे इथे पाहिला होता. यावरून जशी पक्ष्यांना इतरांपेक्षा आधीच संकटाची जाणीव होते तशीच यालाही होते, असे कदाचित यामधून कलाकाराला सुचवायचे असेल. अशा प्रकारची अतिमानवी शक्ती असलेला हा रक्षक यक्ष इथे असताना कोणतीही दृश्य वा अदृश्य शक्ती या लयनसमूहाचे नुकसान करू शकणार नाही अशी दृढ श्रद्धा इथल्याही लोकांची असणार हे उघड आहे. त्याच्या जवळ ब्राह्मी लिपीत आणि प्राकृत भाषेत एक शिलालेख कोरला आहे. त्यात म्हटले आहे , “कन्हाचा शिष्य बलक याने हे तयार केले.’’ या अक्षरवाटिकेवरून याचा काळ इ. स. पूर्व 1 ले शतक असा ठरवण्यात आला आहे. या शिल्पाच्या शेजारी खडकात अजून एका शिल्पाचे अवशेष पाहायला मिळतात. त्यामध्ये चेहरेपट्टी वगैरे काही शिल्लक नाहीये, पण जो खडकाचा उठाव आहे त्यावरून तिथेही एक मानवी आकृती कोरली असावी असा अंदाज लावता येतो. कदाचित इथे यक्ष आणि यक्षी अशी जोडी कोरली असेल, असे वाटते. या दुर्मिळ पुराव्यामुळे कोंडाणे येथील लयनसमूहाचे महत्त्व जास्त उठून दिसते. या चैत्यगृहाशेजारी एक मोठा विहार आहे. त्यामध्ये 18 खोल्या आहेत. पुढे एक व्हरांडा आहे. त्याच्या एका बाजूच्या भिंतीत अर्ध उठावातला एक स्तूप कोरला आहे. यामध्ये स्तूपाच्या अंडावर एक चौकोनी खोबण पाहायला मिळते. त्यावरून हा स्तूप कदाचित या विहाराच्या खोदकामाच्या वेळेस मृत पावलेल्या एखाद्या आचार्यांच्या स्मरणार्थ कोरला असावा असे वाटते. त्यांच्या अस्थी कदाचित पूर्वी या खोबणीत ठेवल्या असाव्या. या समूहात 3-4 शिलालेख होते असे सुरुवातीच्या अभ्यासकांनी नोंदवले होते, पण प्रत्यक्षात मात्र ‘बलक’ याचा उल्लेख असलेला एकच शिलालेख प्रसिद्ध झाला. एस. नागराजु या बौद्ध लेणींचा अभ्यास करणाऱया विद्वानांनी त्यांच्या पुस्तकात अजून दोन लेखांचे वाचन दिले, पण काही वर्षांपूर्वी इतिहास आणि शिलालेखतज्ञ डॉ. रूपाली मोकाशी आणि पंकज समेळ यांनी या दोन नवीन लेखांचे वाचन प्रसिद्ध केले आहे.
एकेकाळी भरपूर वर्दळ असलेला हा लेणीसमूह काळाच्या ओघात झाडीत गुडूप झाला. इथे एकाही बुद्धाच्या मूर्तीचे किंवा चित्राचे अवशेष मिळाले नाहीयेत. कदाचित काळाच्या ओघात इतर जास्त सोपे मार्ग विकसित झाल्यामुळे या घाटमार्गाने जाणाऱया व्यापाऱयांची संख्या रोडावली असेल आणि या स्थळाला मिळणारा आश्रय कमी झाला असेल, असे वाटते. परंतु इथे आज दिसणारे सगळे पुरावशेष पाहता याचे त्या काळातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात येते.
(लेखिका टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे येथे संस्कृत व भारतीय विद्या अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख आहेत.)






























































