
राहुरीतील राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेच्या शासकीय लेखापरीक्षणात सात कोटी 37 लाख 62 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट होताच नऊजणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला राहुरी पोलिसांनी काल टाकळीमिया येथील लाख रस्त्यावरील एका हॉटेलवरून गजाआड केले आहे.
कारभारी फाटक असे अटक केलेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे. राजमाता जिजाऊ नागरी पतसंस्थेमध्ये अपहार झाल्याने ठेवी मिळत नसल्याने ठेवीदार अडचणीत सापडले होते. ठेवीदार बचाव कृती समितीच्या अनेक तक्रारींनंतर जिल्हा निबंधकांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक संजय धनवडे व सहायक अनिल निकम, रियाज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ पतसंस्थेच्या कामकाजाचे लेखापरीक्षण करण्यात आले. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2021 या कालावधीमध्ये झालेल्या सर्व व्यवहारांच्या चौकशीमध्ये मोठय़ा प्रमाणात अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले.
राजमाता पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब येवले, उपाध्यक्ष शरदराव निमसे, व्यवस्थापक कारभारी फाटक, सुनील भोंगळ, उत्तम तारडे, सुरेखा सांगळे, सुरेश पवार, दत्तात्रय बोंबले, दीपक बंगाळ या नऊजणांनी पतसंस्थेमध्ये सात कोटी 37 लक्ष 62 हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका लेखापरीक्षणात ठेवण्यात आला आहे.
राहुरी पोलिसांत लेखापरीक्षक संजय धनवडे यांनी या नऊजणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे सर्व आरोपी फरार झाले आहेत. त्यांतील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धावसुद्धा घेतली होती.
व्यवस्थापक कारभारी फाटक यांना 20 एप्रिल 2023 रोजी न्यायालयाने जामीन नाकारल्याने तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. या गैरव्यवहाराचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राठोड व पोलीस निरीक्षक पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतानाच काल पतसंस्थेचा व्यवस्थापक कारभारी फाटक टाकळीमिया येथील लाख रस्त्यावरील हॉटेलमध्ये असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली. पोलीस हॉटेलवर गेले असता, पोलिसांची गाडी पाहून कारभारी फाटक शेतात पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्याला आर्थिक गुन्हे शाखेच्या हवाली करण्यात आले आहे.

























































