राहुल गांधींना विरोधी पक्षनेतेपद नक्की मिळेल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सातारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत काँग्रेस पक्ष विरोधी बाकांवर राहील. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असतो, ते पद राहुल गांधी यांना नक्की मिळेल,’ असा टोला रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. दरम्यान, सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचे काम रिपाइंचे कार्यकर्ते करतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यासोबत त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते. रामदास आठवले म्हणाले, केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार येईल आणि आम्हाला बहुमत मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे झुंजार नेते आहेत. गत निवडणुकीत काँग्रेसला केवळ 42 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळाले नव्हते. आगामी काळात आम्ही त्यांची ‘टेक्निकल’ अडचण दूर करू, त्यांना कॅबिनेट दर्जा असलेले विरोधी पक्षनेतेपद नक्की मिळेल, असे ते म्हणाले. आपल्याला राज्यसभा आणि कार्यकर्त्यांना महामंडळ देण्यास भाजप तयार आहे.

वंचित बहुजन आघाडीसारखे अनेक प्रयोग मी याआधी करून बसलोय. आम्हाला शिवसेना-भाजप अथवा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. ऍड. प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातूनही निवडून येऊ शकत नाहीत. वास्तविक, वंचित बहुजन आघाडीची मते महायुतीच्याच पथ्यावर पडतील, असेही ते म्हणाले.

 …ती शीट आम्ही पाडली

रामदास आठवले यांनी नेहमीप्रमाणे कविता सादर केली. ‘पवारसाहेबांनी ज्यांची कॉलर ओढली…ती शीट आम्ही पाडली,’ अशा शब्दांत त्यांनी केलेल्या शीघ्र कवितेमुळे हास्याचे फवारे उडाले.

काँग्रेसमुळे देशाच्या एकतेला धोका

भाजप हा जातीयवादी पक्ष नाही. काँग्रेसनेच देशात जातीयवादाचे विष पेरले आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर हिंदुस्थानने लष्करी हवाई हल्ला करून दहशतवादी तळ नष्ट केले होते. या कारवाईवर काँग्रेसने अनेक शंकाकुशंका उपस्थित केल्या होत्या. काँग्रेसमुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.