Video-आठवलेंना अंबरनाथमध्ये धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अंबरनाथ

रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे संविधान गौरव सभेसाठी आज अंबरनाथ येथे आले असता त्यांना धक्काबुक्की करण्याची घटना घडली. त्यानंतर अंबरनाथ- उल्हासनगर परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

आठवले यांच्या उपस्थितीत विमको नाका परिसरात संविधान गौरव सभेचे आयोजन रिपाइंतर्फे करण्यात आले होते. या कार्यक्रमात आठवले यांचे भाषण झाले. त्यानंतर स्टेजवरून उतरून ते गाडीकडे जात असताना एका इसमाने त्यांना धक्काबुक्की केली. त्यावेळी रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी त्याला तिथेच पकडून चोप दिला. त्यनंतर पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे. त्या इसमाचे नाव प्रवीण गोसावी असे असल्याचे समजते. त्याने आठवले यांच्यावर हल्ला करण्याचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. या प्रकारानंतर आठवले आपल्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना झाले.