
सामना प्रतिनिधी, मुंबई
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियास (आठवले गट) देण्यात यावा अशी जोरदार मागणी या पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली. आपण राज्यसभेचे खासदार आहात. तरीसुद्धा आपल्या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे, असे आश्वासन शहा यांनी आठवले यांना या भेटीत दिले. आठवले-शहा यांच्यात आज झालेल्या या भेटीमुळे रिपब्लिकन पक्षाचा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरील दावा अधिक प्रबळ झाला आहे.
रिपब्लिकन पक्षाचा एकही प्रतिनिधी लोकसभेत नसल्याने रामदास आठवले यांना निवडून देऊन लोकसभेत रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, असे आठवले यांनी दिल्लीत झालेल्या चर्चेत शहा यांना सांगितले.




























































