विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव भास्कर शेट्ये यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव व निवृत्त न्यायाधीश भास्कर नारायण शेटय़े यांचे आज दुपारी मुंबई येथे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 89 वर्षे होते.

रत्नागिरीचे सुपुत्र असणारे भास्कर शेटय़े यांचे शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरीतच झाले. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी घेतली. काही काळ वकिली केल्यानंतर त्यांची न्यायाधीश म्हणून निवड झाली. सांगली, पुणे, नाशिक, राधानगरी, कोल्हापूर, धुळे, चाळीसगाव, पालघर, पणजी आदी ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम केले होते. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र विधिमंडळाचे प्रधान सचिव म्हणून निवड झाली. विधानसभा सचिव म्हणून त्यांनी दहा वर्षे कामकाज पाहिले.

विधिमंडळ सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांची नव्यानेच निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गोव्याचे बँकिंग लोकपाल म्हणून निवड झाली. बँकिंग लोकपाल म्हणून त्यांनी तीन वर्षे काम पाहिले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक-सदस्य म्हणून ते अनेक वर्षे काम करीत होते. त्यांना विविध नामवंत संस्थांचे पुरस्कार लाभले होते. मुंबईतील प्रसिद्ध लाड फाउंडेशनच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

निवृत्तीनंतर भास्कर शेटय़े यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. गेले काही महिने ते मुंबईत आपल्या मुलाकडे वास्तव्याला होते. तेथेच आज दुपारी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी शामल, ज्येष्ठ चिरंजीव मुंबई हायकोर्टाचे अॅड. सचिंद्र शेटय़े तसेच त्यांचे धाकटे चिरंजीव तारांगण क्षेत्रात काम करणारे अभिजित शेटय़े , सुना, नातवंडे असा परिवार आहे.