
रत्नागिरी तालुक्यातील गोळप, संजिवनी नगर येथे अज्ञात चोरट्याने बंद घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून 3 लाख 37 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या चोरीचा छडा पोलिसांनी 12 तासात लावून आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सदर पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या. पथकाकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता. सदर पथकाने विविध ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याआधारे हा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार जलील सोलकर याने केल्याचे निष्पन्न केले.
त्यावरुन आरोपी जलील अब्दुल्ला सोलकर (वय – 61, रा. कर्ला, मोठया मशिदीजवळ, ता. रत्नागिरी) यास 12 तासात अटक करुन त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 2,43,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे.
आरोपी जलील अब्दुल्ला सोलकर हा रत्नागिरी शहरामधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे एकूण 24 गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अमोल गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष भागणे, विजय आंबेकर, सागर साळवी, योगेश नार्वेकर, दिपराज पाटील, वैष्णवी यादव, पोना दत्तात्रय कांबळे यांनी केली.

























































