
आज जग वेगाने बदलत आहे. नवनवीन ज्ञानाची दालने खुली होत आहेत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेनेदेखील नवीन युगाचे ज्ञान ‘रयत’च्या विद्यार्थ्याला मिळावे म्हणून काही बदल स्वीकारले आहेत. त्यानुसार जगामध्ये असणारे नामांकित विद्यापीठ ऑक्सफर्ड, तसेच आयबीएम कंपनी यांच्याशी सामंजस्य करार करीत असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी येथे केले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक ‘पद्मभूषण’ डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथी कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून पवार बोलत होते. प्रारंभी खासदार शरद पवार व मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यांनी कर्मवीरांच्या समाधीस अभिवादन केले. कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, विश्वजीत कदम, चेतन तुपे, सुमन पाटील, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, आयबीएम कंपनी 120 देशांत काम करीत असून 100 टक्के नोकरी मिळण्याचा मार्ग आपल्याला उपलब्ध आहे. बिल गेट्स यांची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात काम करते. तिचे सहकार्य घेऊन ज्ञान घेण्याची संधी आपल्याला मिळत आहे. आज रयत शिक्षण संस्थेच्या 737 शाखा असून त्यामध्ये चार लाख 34 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांपैकी 54 टक्के विद्यार्थी मागासवर्गीय असून, 46 टक्के अन्य आहेत. 49 टक्के मुली संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत.
‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवार यांची फेरनिवड
रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. सातारा येथे आज मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत ही फेरनिवड झाली. संस्थेच्या सचिवांची निवड यावेळी केली गेली नाही. कर्मवीर पुण्यतिथीदिनी दर तीन वर्षांनी संस्थेचे पदाधिकारी निवडले जातात. आज केवळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य यांचीच निवड करण्यात आली. सचिवपदी सध्याचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर हेच तूर्त पदावर राहणार असून सहा महिन्यांनी नवीन सचिवाची निवड केली जाणार आहे.

























































