दलित चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र, खंडणीचा गुन्हा परत घेण्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

नगरसेवक सचिन मस्के व विनोद खटके यांच्यावर अपहरण आणि खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करून दलित चळवळीला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी सर्वपक्षीय नेते आणि संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सचिन मस्के हे नगरसेवक आहेत तर विनोद खटके हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. खटके यांनी ऑक्टोबर महिन्यात नोकर भरती मेळावा घेतला होता. या मेळाव्यात त्यांनी अविनाश चव्हाण खून प्रकरणातील आरोपी आणि मंत्र्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. विजयसिंह परिहार आणि पालकमंत्र्यांचे जुनेच हितसंबंध आहेत. त्यामुळे पालकमंत्री आणि इतरांनी षडयंत्र करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे काढून घ्यावेत अन्यथा दलित संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर रणधीर सुरवसे, प्रतीक कांबळे, अंगद भोसले, महेंद्र बनसोडे, कबीर शेख, किरण पायाळ, धम्मशील गायकवाड, मोहन गोरे, बाबासाहेब कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.