
सामना प्रतिनिधी । अलिबाग
धो धो पाऊस पडूनही दरवर्षी पाणीटंचाईशी सामना करणाऱ्या रायगडवासियांच्या चिंतेत आणखीन भर पडली आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजनाच पाण्यात गेली असून जागोजागी मारलेल्या बोअरवेलमुळे भूजलचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत भूजल पातळी 0.49 मीटरने घटली आहे. परिणामी जानेवारीतच विहिरींनी तळ गाठला असून शेकडो बोअरवेल कोरड्याठाक पडल्या आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी भूजल संपत्तीची होणारी वारेमाप लूट रायगडवासियांचा हंडा भविष्यात रिकामा ठेवणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसा गंभीर इशाराच भूगर्भ सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने आपल्या अहवालात दिला आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी तीन हजार मिलिमीटर एवढा प्रचंड पाऊस पडतो. मात्र जलयुक्त शिकार योजना, पाणी आडवा पाणी जिरवा, यांसारख्या योजना राबवूनही जलसाठ्यात भर पडलेली नसल्याचे सरकारी अहवालावरून उघड झाले आहे. भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत गेल्या पाच वर्षांत 0.49 मीटर घट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. माथेरानमधील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत 0.12 मीटरने घट झाली आहे. अलिबाग, उरण या तालुक्यातील भूगर्भात गोडे पाणी झपाट्याने कमी होत असल्याने बोअरवेलला खारे पाणी येऊ लागले आहे. जिल्ह्यात काढलेले सिमेंट काँक्रीटचे जंगल, जंगलाची होत असलेली जंगलतोड तसेच भूगर्भातील होणारा बेसुमार पाण्याचा उपसा यामुळे रायगड जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात कमालीची घट होत असल्याचे भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
60 टक्के पाणीपुरवठा भूगर्भातून
रायगडमध्ये 60 टक्के पाणीपुरवठा विहीर, बोअरवेल योजनांमधून केले जाते. यामुळे भूगर्भात कमी झालेल्या पाणीसाठ्याचा परिणाम या जलस्त्रोतांवर होत आहे. सुधागड, पोलादपूर तालुक्यातील डोंगराळ भागात काही नमुना विहिरींमध्ये कमालीची घट झालेली आहे. त्यामुळे पाणी जिरवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. – डी.बी. ठाकूर, वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणा, रायगड.
भौगोलिक रचनेचाही फटका
जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचाही फटका पाणीसाठ्यावर झाला आहे. जिल्ह्यात मुख्यत्वेकरून बेसाल्ट नाकाच्या अग्निजन्य खडकाने व्यापलेला आहे. या खडकाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. म्हसळा, श्रीवर्धन, तळा व मुरुड या तालुक्यामध्ये डोंगरमाथ्यावर लॅटेराईट या प्रकाराचा खडक आढळतो. या खडकात काही प्रमाणात पाणी साचून राहतो. परंतु बेसुमार होणारी वृक्षतोड आणि पावसाचे पाणी थेट समुद्रात वाहून जात असल्याने जमिनीत पाणी जिरत नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.





























































