नीलम गोऱ्हेंना हटवा! शिवसेनेची जोरदार मागणी

विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार विधिमंडळ सदस्य म्हणून अपात्र ठरतात. उपसभापतींच्या विरोधात जेव्हा अविश्वास ठराव दाखल होतो तेव्हा त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विधिमंडळ सचिवालयाकडे करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन नीलम गोऱ्हे यांना उपसभापती पदावरून तात्काळ दूर करा, अशी मागणी केली आहे.

 विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेल्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेत जाब विचारला. उपसभापतीपदावर असताना गोऱ्हे यांनी पक्षांतर केले आहे. सभागृहात कामकाज करताना त्या योग्य न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना उपसभापती पदावर राहण्याचा कोणताही संवैधानिक अधिकार नाही. त्याबाबत सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधकांनी आज लावून धरली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अनिल परब, प्रतोद विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी व्हेलमध्ये उतरत ‘सभापती हाय हाय’च्या घोषणा दिल्या. मात्र, उपसभापती गोऱ्हे यांनी चर्चेची मागणी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला.

महविकास आघाडीचे शिष्टमंडळ राजभवनावर

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केले आहे. त्यामुळे त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधीची नोटीस आम्ही दिली आहे. ज्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्यांच्यावर सदस्यांचा विश्वास राहीलेला नाही. अशा व्यक्तीने उपसभापती पदावर बसू नये, अशी मागणी आम्ही सभागृहात केलेली आहे. यामुळे विधानपरिषद सभागृहात घटनात्मक पेच निर्माण झाल्यामुळे उपसभापती पदाबाबत तातडीने निर्णय घेऊन गोऱ्हे यांना पदावरून दूर करावे, अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनात भेट घेऊन केली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेचे गटनेते अनिल परब, प्रतोद विलास पोतनीस, उपनेत्या सुषमा अंधारे, सुनील शिंदे, अनिल देशमुख, नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, सुधाकर अडबाले, अरुण लाड, शशिकांत शिंदे, अभिजीत वंजारी, नरेंद्र दराडे, अशोक जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

…तर सभापतींचे सदस्यत्व आपोआप रद्द होते 

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील अधिवेशन सुरू होताच उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या पक्षांतरामुळे त्यांच्या पदावरच आक्षेप घेतला. ते म्हणाले, मला तुमच्या पदाबद्दल आक्षेप आहे. उपसभापतीपद किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे पद स्वीकारताना अशा व्यक्तींचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आपोआप रद्द होते.

फडणवीसांकडून गोऱ्हेंची वकिली

शेकापचे जयंत पाटील यांनी उपपस्थित केलेला मुद्दा विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी उचलून धरला. मात्र, या आक्षेपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत गोऱ्हे यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. त्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत आधी चर्चा करा, आम्हाला बोलू द्या, अशी मागणी लावून धरली.

तोपर्यंत समिती नेमून कामकाज चालवावे – अंबादास दानवे

विधान परिषदेच्या उपसभापती यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या पदावर राहून सभागृहाला न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांनी अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा तसेच हा घटनात्मक पेच सुटेपर्यंत त्यांनी समिती नेमावी आणि त्या समितीच्या वतीने परिषदेचे कामकाज चालवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.

अविश्वास प्रस्ताव दाखल करू – भास्कर जाधव

शिंदे गटात जाण्याआधी उपसभापती नीलम गोऱ्हे या पक्षपातीपणा करतात. सत्ताधारी सदस्यांना बोलू देत नाहीत, असा आरोप करत भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र, आता गोऱ्हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी गोऱ्हे यांच्याविरोधातला प्रस्ताव मागे घेतला आहे. त्यावर बोलताना, जर नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातला अविश्वास प्रस्ताव मागे घेतला गेला असेल तर महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला जाईल, असे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.

मिंधें गटात गेलेल्या तीन आमदारांना अपात्रतेची नोटीस 

पक्षांतरबंदी कायद्यानुसार शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे, विपल्व बजोरिया यांना अपात्र करा, अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवा, अशी वेगळी नोटीसही आज विधानसभा सचिवांना बजावण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे परिषदेतील गटनेते अनिल परब यांनी दिली.