पोलीसांनी आपल्या वाहनांवरील POLICE हा शब्द काढून टाकावा

81

सामना प्रतिनिधी । नांदेड

पोलीसांनी आपल्या वाहनावर, नंबर प्लेटवर लिहिलेले पोलीस हे शब्द त्वरीत काढून टाकावे नसता त्यांच्याविरुध्द मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल,असा एक बिनतारी संदेश शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम यांनी काल रात्री संपूर्ण जिल्हाभरातील सर्व पोलीस स्टेशन, सर्व वाहतूक शाखा प्रमुख यांना पाठविला आहे.

काल रोजी जाहीर झालेल्या या बिनतारी संदेशात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या वाहनांच्या नंबर प्लेटवर POLICE असे शब्द लिहिल्याबद्दलच्या तक्रारी नागरीकांकडून प्राप्त होत आहेत. मोटार वाहन अधिनियमप्रमाणे नंबर प्लेटवर फक्त परिवहन विभागाने दिलेला नोंदणी क्रमांक लिहायचा असतो त्या व्यतिरिक्त कांहीही शब्द नंबर प्लेटवर लिहिणे मोटार वाहन कायद्यानुसार बेकायदेशीर आहे.

सर्व ३६ ठाणेदार आणि इतर विभागाचे सर्व शाखाप्रमुख यांना पाठविलेल्या या बिनतारी संदेशात असे नमुद करण्यात आले आहे की, पोलीस असा शब्द लिहिलेल्या पोलीसांच्या वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. सर्व ठाणेदार आणि इतर प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस हा शब्द आपल्या वाहनांवरून काढून टाकण्याची सुचना करावी असे प्रत्यक्षात न झाल्यास त्यांच्या विरुध्द मोटारवाहन अधिनियमप्रमाणे कार्यवाही करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या