नोटबंदीवर आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची प्रतिक्रिया, वाचा काय म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीची घोषणा करत 2000च्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या आहेत. 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजाराच्या नोटा बँकेत जमा कराव्यात किंवा बदलून घ्याव्यात, अशी नियमावलीही जाहीर केली. त्यावर राजकीय आणि आर्थिक अशा दोन्हीकडे प्रतिक्रियांना उधाण आलं. मात्र आता, दोन हजारांच्या नोटा बंद करत असल्याची घोषणा केल्यावर तीन दिवसांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत प्रतिक्रिया नोंदवली आहे.

दास म्हणाले की, नागरिकांना चलनातून बाहेर गेलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. लोक आरामात नोटा बदलून घेऊ शकतात. याकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. जुन्या नोटा बदलून घेण्याच्या या कृतीला कोणत्याही प्रकारचा निर्बंध मानण्यात येऊ नये. हिंदुस्थानची चलन व्यवस्थापन यंत्रणा ही अतिशय मजबूत यंत्रणा असून 500 रुपयांच्या नोटांची अधिक संख्येने छपाई होणार की नाही हे जनतेच्या मागणीवर अवलंबून असेल, असं दास म्हणाले आहेत.

‘2 हजाराची नोट चलनात आणण्याची अनेक कारणं होती. त्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं होतं, त्याअंतर्गतच नोटा चलनात आणल्या गेल्या. बँकांना नोटा बदलण्यासाठी डेटा तयार करावा लागले आणि त्यासाठी 2000च्या नोटेचे तपशील बँका ठेवतील. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सामान्य पद्धतीने पार पडेल. कुणीही घाई-गडबड करून बँकेत धाव घेऊ नये. तसंच, ही नोट वगळता अन्य कोणत्याही नोटेवर बंदी नसून बाकी सर्व नोटांचं चलन पूर्ववत राहील, असंही दास यांनी स्पष्ट केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, 2 हजारांच्या नोटांना चलनातून बाद करणं हे क्लीन नोट पॉलिसी या चलनी धोरणाचा एक भाग आहे आणि हा टप्पा रिझर्व्ह बँकेच्या चलन व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत आहे. नोटा बदलून घेण्यासाठी अवधी दिलेला असल्याने लोकांनी गडबडून नोटा बदलून घेऊ नये. ज्या काही अडचणी येतील, त्याची नोंद आरबीआय घेईल आणि जनतेला त्याचा त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.