भयावह स्पर्धेचं वास्तव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>श्रीकांत आंब्रे

रेस’ हा कविता शिरोडकर यांचा तिसरा कथासंग्रह. यापूर्वीच्या ‘शिशिरपर्ण’ व ‘आतला कप्पा’ या दोन कथासंग्रहांपेक्षा विषय आणि आशयाच्या दृष्टीने अधिक परिपक्व व थोडी वेगळी वाट चोखाळणारा. प्रामुख्याने स्त्रोताच्या सुखदुःखाचा वेगवेगळय़ा स्तरावरील आविष्कार करताना स्त्रोताच्या मनोविश्वातील विविध कप्पे आणि रहस्ये त्या सहज उलगडत जातात. हा नवा कथासंग्रहही त्याला अपवाद नाही. आजच्या स्पर्धात्मक जगात जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये चाललेली जीवघेणी स्पर्धा, त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊन केली जाणारी कुरघोडी, त्यासाठी दुसऱ्याचे जीवन उद्ध्वस्त करण्याची ईर्षा, त्यातून आलेली निगरगट्ट, संवेदनाहीन वृत्ती या साऱ्याचा विपरीत परिणाम बुद्धिमान व कर्तबगार स्त्रोतावर होत असतो. त्यामुळे स्वतःच्या सामर्थ्यावर आपलं ‘करीयर’ घडवू पाहणाऱ्या अशा स्त्रोताची होणारी परवड याचं विदारक वास्तव हा या कथांचा गाभा आहे. ‘रेस’ या दीर्घकथेत एका कॉर्पोरेट कंपनीत दाखल झालेल्या हुशार आणि कर्तृत्ववान नंदिनीला जेव्हा तिथलं हिंस्र जीवघेणं, किळसवाणं आणि सूडाचं राजकारण कळतं तेव्हा तिच्या डोळय़ांसमोर असणाऱया आदर्श संकल्पनांचा चक्काचूर होतो. कॉर्पोरेट जगातील स्पर्धेच्या भयावह मानसिकतेवर लेखिकेने चांगला प्रकाश टाकला आहे. तशाच वृत्तीचं दर्शन ‘शोबिझ’ या दीर्घकथेत घडतं. ‘शोबिझ’ हे फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्रजी मासिकाचं नाव. या मासिकाच्या तथाकथित उच्चभ्रू आणि ‘हायफाय’ उद्योगाची काळी बाजू दाखवताना त्यातील दृष्ट प्रवृत्ती, अनैतिकतेचा बाजार, महत्त्वाकांक्षेपोटी आदर्श मूल्यांची होणारी पडझड आणि स्वार्थासाठी काहीही करण्याची तयारी याचं एक वेगळंच विश्व इथे पाहायला मिळतं. आजच्या तथाकथित उच्चभ्रू संस्कृतीचं वास्तव लेखिकेने कथारूपाने प्रत्ययकारीपणे मांडलं आहे. ‘रॅली’ या कथेत पैसे वाटून सभेला गर्दी जमविण्यासाठी पुढाऱ्याने केलेला गरीब, असहाय्य स्त्रोताचा वापर राजकारणातील अनिष्ट प्रवृत्तींची झलक दाखवतो. ‘तुटलेले पंख’ या कथेत कॉलेजमधील भंपक युवक नेत्याचं आणि त्याच्या आकर्षणाला बळी पडलेल्या निष्पाप विद्यार्थिनीच्या व्यथेचं दर्शन घडतं. ‘कधी कधी असंही’ या कथेत मनाचा थांगपत्ता लागू न देणाऱया पतीच्या अमानुष क्रौर्याची शिकार झालेल्या पत्नीची शोकांतिका समोर येते, तर ‘इच्छापूर्ती’ या कथेत कॅन्सरग्रस्त पतीच्या इच्छापूर्तीसाठी त्याच्या मित्राशी लग्न करण्याचं वचन देणारी पत्नी पतीप्रेमाचा एक वेगळा आदर्श निर्माण करते.

या सहाही कथा ‘फ्लॅशबॅक’ तंत्राने सुरू होतात. सर्वच कथा रहस्यप्रधान आहेत आणि यातील रहस्य क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारं आहे. प्रत्येक प्रसंग सहज संवादातून आणि आकर्षक वर्णनशैलीतून डोळय़ांसमोर उभा करण्याचं सामर्थ्य लेखनात आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेचे स्वभावविशेष सूक्ष्म निरीक्षणदृष्टीतून ठसठशीतपणे साकार होतात. स्पर्धात्मक जगातही निराश न होता येणाऱया वादळांना जमेल तसं सामोऱ्या जाणाऱ्या स्त्रोतही आहेत, हे काही कथांमधून दिसतं. तरीही सभोवतालच्या परिस्थितीमुळे जाणवणारं एकाकीपण हा मानवी स्वभावाचा एक भाग आहे, हेही लक्षात येतं. चित्रकार ल. म. कडू यांचं मुखपृष्ठ आशयाला अनुरूप आहे.

रेस (कथासंग्रह)

लेखिका – कविता शिरोडकर
प्रकाशन – अक्षता प्रकाशन
पृष्ठ – १५०, मूल्य – २४० रुपये