मालवणचे रॉक गार्डन समस्यांच्या गर्तेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मालवण

मालवणात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख केंद्र असलेले रॉक गार्डन समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. गार्डनच्या प्रवेशमार्गावर स्टॉलधारकांची गर्दी वाढतच चालली असून प्रवेशमार्गच हरवला आहे. त्यात रॉक गार्डनचा कोणताही फलक मार्गावर लावण्यात आला नसल्याने गार्डन पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना रॉक गार्डनसमोर उभे राहून ‘रॉक गार्डन कुठे’ अशी विचारणा करावी लागत आहे.

समुद्राच्या धडकणाऱ्या लाटां व रॉक गार्डनचा नजरा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक व स्थानिक दररोज गार्डनला भेट देतात. मालवण पालिकेचे हे गार्डन पर्यटन नकाशावर आले आहे. मात्र गार्डनचे प्रवेशद्वार समस्यांचा सामना करत आहे. चार पैसे मिळतील या आशेने काही व्यवसाईकांनी येथे स्टॉल उभारणी केली. जशी गार्डनमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली तशी प्रवेशद्वारावर स्टॉलची संख्या वाढत गेली. अपुऱ्या जागेत वाढत्या स्टॉलमुळे प्रवेशमार्गही हरवून गेला अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्टॉल धारकांना एकत्रित करून कोणावरही अन्याय न करता त्यांच्या स्टोलची जागा निश्चित करून द्यावी व प्रवेशमार्ग मोकळा करावा अशी मागणीही केली जात आहे. मात्र, त्यासाठी प्रशासन पुढाकार घेताना दिसत नाही.

जागेचा तिढा
रॉक गार्डन हे पालिकेच्या अखत्यारीत असले तरी प्रवेशमार्ग जागा ही बांधकाम विभागाची असल्याने पालिकेचे हाताच दगडाखाली अडकले आहेत. स्टॉल धारकांना नियमावली करून देणे अथवा स्टॉलची जागा निश्चित करणे हा पालिकेसमोर गुंता निर्माण झाला आहे.

समन्वयासाठी प्रयत्न गरजेचे
जर प्रवेशमार्ग जागा बांधकाम विभागाची असेल तर पालिकेने बांधकाम विभाग व स्टॉल धारकांना एकत्रित करून समन्वय साधावा. रॉक गार्डन समोर कशाही पद्धतीने झालेल्या स्टॉल उभारणीमुळे पर्यटनावर परिणाम होणार तर नाही ना याची काळजी सर्वांनीच घ्यावी. असे प्रयत्न व्हावेत असाही सूर उमटत आहे.

जागा पालिकेला मिळावी
प्रवेशमार्ग असलेली बांधकाम विभागाची जागा पालिकेला मिळावी यासाठी वरिष्ठ स्थरावर पाठपुरावा सुरू आहे. प्रवेशमार्गावर मोठी कमानी व फलकही लावण्याबाबत नियोजन सुरू आहे. जागा ताब्यात मिळाल्यास याबाबत तात्काळ कार्यवाही होईल. मात्र गार्डनच्या प्रवेशमार्गावर अडथळा निर्माण झाला असेल तर त्याबाबत कार्यवाही केली जाईल. अशी माहिती आरोग्य व पर्यटन सभापती पंकज सादये यांनी दिली.