फडणवीस यांनीच महाराष्ट्रात जातीयवाद, धर्मवाद वाढविला! आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘2014नंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून राज्यातील एकता, समानता नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. जातीयवाद, धर्मवाद मोठय़ा प्रमाणात वाढविला. शेतकरी, सामान्य नागरिकांचे महत्त्वपूर्ण विषय बाजूला ठेवत राजकीय पक्ष आणि कुटुंब फोडण्याचे काम त्यांनी केले. ‘सागर’ बंगला हा जनतेचे प्रश्न सोडविण्याठी नाही, तर आमदार फोडण्याचे केंद्र बनला आहे,’ असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह ‘तुतारी’ चिन्ह श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण करण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, बळीराम साठे, सुभाष भोसले, संदीप मांडवे, अनिता पवार, ऍड. दीपक पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छोटे पक्ष संपवून टाका, भाजप एकमेव पक्ष राहिला पाहिजे, असे सांगितले आहे. याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, ‘याचा अर्थ आता आपण हुकूमशाहीकडे जात आहोत. 2024नंतर या देशात संविधान, लोकशाही राहणार नाही. शेतकरी, बेरोजगार युवक यांना संविधानाने दिलेला लढायचा हक्क हिरावला जात आहे. म्हणून हुकूमशाहीकडे जायचे नसेल, तर भाजपला सत्तेबाहेर ठेवावे लागेल,’ असे आवाहन रोहित पवार यांनी केले. राज्यात शाहू-फुले-आंबेडकर यांची, संतांची परंपरा शरद पवार यांनी जपली आहे. ‘तुतारी’लाही अशीच परंपरा आहे. आनंदाच्या क्षणी किंवा संघर्षाची सुरुवात करायची असेल, तर तुतारी फुंकली जाते. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार सत्ताधाऱयांच्या ‘तुताऱया’ वाजवतील,’ असा इशारही पवार यांनी दिला.

भाजपचे प्रामाणिक नेते नाराज; पक्षातून बाहेर पडतील!

– ‘भाजपच्या अनेक प्रामाणिक नेत्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना ते मिळाले नाही. उलट ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच भाजपने पक्षात घेऊन पदे दिली. त्यामुळे भाजपचे अनेक निष्ठावंत नाराज आहेत. लोकसभा निवडणूक होऊ द्या, हे नेते बाहेर पडतील,’ असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला.