मीरा रोडमध्ये कुर्बानीवरून राडा; पूनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी विरुद्ध डुक्कर, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे तणाव निवळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मीरा रोड येथील पूनम क्लस्टर सोसायटीत आज कुर्बानीच्या बकऱयांवरून जोरदार राडा झाला. सोसायटीच्या आवारात आणलेले बकरे हटवण्यासाठी जमाव रस्त्यावर उतरला. त्यातील एकावर ब्लेडने वार झाल्याचे कळताच परिस्थिती स्फोटक झाली. त्यातच काही जणांनी डुक्कर आणून सोसायटीत सोडले. अखेर पोलिसांनी धाव घेत यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर तीन टेम्पो भरून बकरे सोसायटीच्या बाहेर नेण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला.

मीरा रोड येथील पूनम क्लस्टर-1 या मोठय़ा गृहसंकुलात काही जणांनी ईदच्या कुर्बानीसाठी 30 ते 40 बकरे आणले होते. हे बकरे सोसायटीत ठेवू नये असे सांगत रहिवाशांनी विरोध केला, परंतु या विरोधानंतरही बकरे तेथेच ठेवण्यात आले. त्यामुळे दोन गटांमध्ये प्रचंड वाद झाला. धक्काबुक्कीही झाली.

ब्लेडने हल्ला केल्याचा आरोप

पोलिसांनी धाव घेऊन मध्यस्थी केली व वाद शांत केला. मात्र पुन्हा दोन गटांत जोरदार बाचाबाची झाली आणि त्यातील एका इसमाने ब्लेडने दुसऱया गटाच्या तरुणावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे वातावरण प्रचंड तणावपूर्ण बनले. वाद इतका टोकाला पोहोचला की, दुसऱ्या गटाने डुक्कर आणून सोसायटीत सोडले. पोलिसांनी हे डुक्कर सोसायटीबाहेर नेऊन सोडले. यावेळी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. याप्रकरणी शेख अब्दुल रहीम शेख (44) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

तीन टेम्पो भरून बकरे सोसायटीबाहेर नेले

जोपर्यंत बकरे सोसायटीबाहेर नेत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा सोसायटीतील रहिवाशांनी घेतला. अखेर पोलीस व महापालिका प्रशासनाने मध्यस्थी करत सर्व बकरे तीन टेम्पोत भरून नेले. त्यानंतर वाद शमला. काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.