
दिलीप जाधव । खेड
पावसाळ्यात वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी खेड तालुक्यातील निसर्गरम्य रघुवीर घाटात मोठय़ा प्रमाणात पर्यटक येऊ लागल्याने सुट्टीच्या दिवशी येथे फार मोठी गर्दी होऊ लागली आहे. एका बाजूला उंचच्या उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसऱ्या बाजूला धुक्याचे अच्छादन घेतलेले खोल दरी हा निसर्गाचा नजराणा पाहताना स्वर्गसुखाचा अनूभव आल्याशिवाय रहात नाही. इथला निसर्ग न्याहाळताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही परंतू येथील खोल दरीच्या पार्श्वभुमीवर पर्यटकांनी सेल्फीच्या मोहाला आवर घालावा असे आवाहन पोलीस प्रशशासनाकडून करण्यात आले आहे.
सृष्टी निर्मात्याने कोकणाला भरभरून निसर्गसौंदर्य बहाल केले आहे. विविधतेने नटलेला निसर्ग न्याहाळताना, डोळ्यात साठवताना डोळ्याचे पारणे फिटते. कोकण भुमीत जो कोणी येतो तो इथल्या निसर्गसौंदर्यांवर अक्षरशः फिदा होऊन जातो. पावसाळ्यात तर हे सौंदर्य आणखीनच खुलते. हिरवागार शालू पांघरलेले डोंगर, त्यातून अवखळपणे वाहणारे निर्झर, नागमोडी वळणे घेत डोंगरमाथाकडे जाणारे घाटरस्ते यामुळे निसर्गाचे सौंदर्य अगदी तिट लावल्यासारखे खुलते. रिमझिम पावसात पसरलेल्या दाट धुक्यात हरविलेले घाटातील रस्ते, खोल दरीतुन हळुहळु वर येणारी दाट धुक्क्याची चादर न्याहाळताना मिळणारे स्वर्ग सुख अनोखे आहे. निसर्गाची ही जादूई दुनिया पाहण्यासाठी पावसाळ्यात वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते.
खेड सिंधी मार्गे सातारा मार्गावरील रघूवीर घाटही या पैकी एक. खेड तालुक्यातील खोपी या गावांपासुन या घाटाला सुरवात होते. खोपी गाव पार केल्यावर नागमोडी वळण रस्ता सुरु झाला की आपण रघुवीर घाट चढायला सुरवात केली आहे, हे लक्षात येते. घनदाट वृक्षराजीतून हा घाट रस्ता वळवण सिंधी, उचाट या गावांमार्गे सातारा जिल्ह्यात जातो. घाट चढतानाच रस्त्याच्या उजव्या बाजुला असलेल्या डोंगरातून खळखळ करत वाहणाऱ्या दुधाळ धबधब्यांची रांग आपले लक्ष वेधुन घेते. प्रत्येक धबधबा आपल्याला मोहीत करत असतो. जसजसे आपण घाट चढत जातो तसतसा थंड हवेचा झोका मन उल्हासीत करु लागतो. खोपीपासुन साधारण सहा ते सात किलोमीटर अंतर पार केले की निगर्गाच्या खऱ्या चमत्काराला सुरवात होते. डाव्या बाजुला नजर पुरणार नाही इतका उंच कातळी कडा तर उजव्या बाजुला खोल दरी. दरीत पसरलेल्या धाट धुक्यामुळे दरीत डोकावुन पाहीले तर काहीही दृष्टीस पडत नाही मात्र दरीतील धुकं जेव्हा वर येऊ लागते तेव्हा निसर्गाची चंदेरी चादर कुणीतरी वर घेऊन येत असल्याचा भास होतो.
थोडे पुढे गेल्यावर उंच कड्यातुन अवखळपणे कोसळणारे दुधाळ धबधबे आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्यावरुन चालताना धबधब्याचे अंगावर उडणारे पाण्याचे तुषार रोंमांचित करतात. खळखळून वाहणारे हे दुधाळ धबधबे पाहिले की धबधब्याखाली बसुन चिंब भिजण्याचा मोह आवरता येत नाही.
निसर्गाचा अदभुत नजराणा असलेल्या रघुवीर घाटात सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. घाटातुन दिसणारे सृष्टी सौंदर्य न्याहाळताना मनाला लाभणाऱ्या अतीव समाधानाचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधण्यात आलेल्या संरक्षक कठड्यावर बसुन येथील निसर्गसौदर्य अनुभवताना वेळ कसा जातो हे कळतही नाही. आता तर शासनाने लाखो रुपये खर्च करुन घाटात पर्यटकांना बसण्यासाठी खास व्यवस्था केली आहे. घाटाच्या माथ्यावर बांधलेल्या छत्रीसारख्या इमारतीत बसुन खोल दरीत वर येणारी धुक्याच्या चंदेरी चादरीचा अनुभव घ्यायचा असेल तर रिमझिम पाऊस पडत असताना या घाटात जायलाच हवे.
रविवार आणि सुट्टीच्या दिवशी तर या घाटात पर्यटकांची जत्रा भरलेली असते. यामध्ये युवा वर्ग मोठय़ा प्रमाणात असतो. पुर्वी रघुवीर घाटात खाण्यापिण्याची कोणतीही सुविधा नव्हती. त्यामुळे घाटात वर्षासहलीसाठी जाणाऱ्या पर्यटकांना जेवण किंवा नास्ता सोबत घेऊन जावे लागत असे मात्र आता घाटमाथ्यावर स्व. बबनराव भोसले यांनी तीन वर्षांपुर्वी हॉटेल व लाँजिगची व्यवस्था केली असल्याने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची जेवण-नास्त्याची चांगली सोय झाली आहे. आता बबनराव भोसले यांचे चिरंजीव अनील व प्रताप हे दोघेजण वडिलांनी सुरु केलेले हॉटेल आणि लॉज सांभाळत आहेत. घाटात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या आदरातिथ्यासाठी शिवसह्याद्री हॉटेल सदैव तत्पर आहे.






























































