दार उघडलं आणि समोर धोनी आला, मराठी तरुणीने सांगितली अविस्मरणीय घटना

महेंद्रसिंह धोनी हा आजही असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असली तरी त्याची चाहती मंडळी जगभर पसरली आहेत. धोनीला एकदातरी भेटावं अशी या चाहत्यांची इच्छा असते. मुंबईतील एका मराठी तरूणीचीही हीच अपेक्षा होती जी अनपेक्षितरित्या पूर्ण झाली. इतरांना धोनीला भेटण्यासाठी फार कष्ट करावे लागतात मात्र 10-15 निवडक लोकांना भेटण्यासाठी धोनी स्वत: मुंबईत आला होता.

धोनी कसा भेटला याबाबत बोलताना ऋतुजा जाधव हिने सांगितलं की एका डॉक्युमेंट्रीसाठी ऑडिशन घेण्यात आली होती. त्यातून जवळपास 15 जणांना निवडण्यात आलं होतं. ज्यामध्ये ऋतुजा हिचाही समावेश होता. या सगळ्यांना कोण भेटायला येणार आहे, काय करणार आहोत हे काहीच सांगण्यात आलं नव्हतं. सामाजिक प्रयोगासाठी एक क्रिकेटवर डॉक्युड्रामा असून तिथे तुम्हाला क्रिकेटचा सामना बघायचा आहे असं सांगण्यात आलं होतं. सामना बघत असताना सगळीकडे कॅमेरे असतील हे देखील सांगण्यात आलं होतं. कोणीतरी हा सामना बघण्यासाठी येणार आहे, बास इतकीच माहिती सगळ्यांना देण्यात आली होती. सामना सुरू झाल्यानंतर दारावर टकटक झाली आणि एकाने दरवाजा उघडला. दाराबाहेर धोनी उभा असल्याचं पाहिल्यानंतर तिथे असलेल्या कोणालावी विश्वास बसला नव्हता. धोनीला पाहिल्यानंतर या सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या त्या एका छोट्या फिल्ममध्ये चित्रीत करण्यात आल्या आहेत.

नो लेज नो गेम नावाचं एक अभियान लेज कंपनीकडून चालवण्यात येत असून यासाठी धोनीची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अभियानासाठी ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आली असून या शॉर्टफिल्ममुळे धोनीला भेटण्याचे आणि त्याच्यासोबत गप्पा मारण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं ऋतुजा जाधव हिने सांगितलं आहे.