सामना अग्रलेख – सोसाट्याचा वारा, दत्ता इस्वलकर

दत्ता इस्वलकर त्यांच्या सहकाऱयांसह एका ध्येयाने लढत राहिले. इस्वलकर म्हणजे कॉ. श्रीपाद अमृत डांगे, दत्ता सामंत यांच्याप्रमाणे महान लढवय्ये वगैरे नेते नव्हते. त्यांचा रुबाब आताच्या कामगार नेत्यांचा नव्हता. ते शिडशिडीत व फाटकेच होते, पण तीच त्यांची ताकद होती. त्यांना वादळाची उपमा देणेही योग्य नाही, पण इस्वलकर हे सोसाटय़ाच्या वाऱयाप्रमाणे होते. गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी जन्मभर वाहून घेतले. त्यादृष्टीने इस्वलकरांचा जन्म सार्थकी लागला. या झुंजार माणसाच्या स्मृतीस आदरपूर्वक अभिवादन! कामगारांच्या हक्कांचा लढा सुरूच ठेवणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

दत्ता इस्वलकर म्हणजे मुंबईतील उद्ध्वस्त गिरणी कामगारांच्या अपयशी लढय़ाचा इतिहास, असे समीकरण रूढ झाले होते. त्या उद्ध्वस्त गिरणी कामगारांचा बुलंद आवाज म्हणून दत्ता मुंबईत वणवण भटकत होते. ही भटकंती आता कायमची विसावली आहे. इस्वलकर हे वयाच्या 72 व्या वर्षी वारले. मुंबईतील गिरणी संपाने आधी चालू असलेल्या गिरण्या 1982 मध्ये बंद पाडल्या. त्या बंद गिरण्यांतील अडीच लाख कामगार व त्यांचे कुटुंब कायमचेच देशोधडीला लागले. राष्ट्रीय मिल मजदूर संघापासून ते संप पुकारणाऱया दत्ता सामंत यांच्यापर्यंत सगळय़ांनीच नंतर कामगारांना वाऱयावर सोडले. उद्योगपती, गिरण्यांचे मालक, माफिया टोळय़ा, सरकार या सगळय़ांनीच गिरण्यांच्या जमिनीचे सौदे करून माल कमवण्यातच धन्यता मानली. गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवरून निर्घृणपणे हटवण्यात आले तेव्हा एक उत्स्फूर्त आंदोलन उभे राहिले. त्याच आंदोलनातून दत्ता इस्वलकर हा कृश शरीराचा तरुण उसळून बाहेर आला व पुढे 1992 पासून ते आजपर्यंत दत्ता हाच त्या शोषित, पीडित कामगारांचा आवाज बनून सरकारदरबारी धडका देत राहिला. दत्ता इस्वलकर यांनी गिरण्यांचा सुखाचा काळही पाहिला व गिरण्यांचे जीवन उद्ध्वस्त होतानाही पाहिले. दत्ता इस्वलकर हे स्वतः गिरणी कामगाराचे पुत्र होते. मुंबईतील मॉडर्न मिलमध्ये इस्वलकरांचे वडील जॉबर होते. स्वतः दत्ता इस्वलकर 1970 मध्ये वयाच्या 23 व्या वर्षी मॉडर्न मिलमध्ये नोकरीस लागले. राष्ट्रसेवा दल आणि समाजवादी चळवळीशी ते जोडले गेले. गिरणी कामगार म्हणजे सतत संघर्ष व लढे हे तेव्हा ठरलेलेच होते. मुंबईवर गिरणी कामगारांच्या एकजुटीचा प्रभाव होता. गिरणी कामगारांची एकजूट हीच मुंबईतील मराठी जनांची एकजूट व महाराष्ट्राची संरक्षण भिंत होती. गिरणी कामगार हीच मुंबईची मराठमोळी संस्कृती होती. 1982 साली दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली

गिरणी कामगारांनी संप

केला. अडीच लाख गिरणी कामगार संपात उतरले. त्या संपात तोडगा काढण्याऐवजी मालक, भांडवलदार व सरकारने हातमिळवणी करून संपात फूट पाडण्याचेच प्रयत्न केले. कामगारांची एकजूट भक्कम होती, पण शेवटी बेरोजगारी, पोटाची आग, कोलमडणाऱया कुटुंब व्यवस्थेने कामगार उद्ध्वस्त झाला. गिरणी कामगारांची तरुण मुले गरिबीस, बेरोजगारीस कंटाळून गुन्हेगारीकडे वळली. गँगवॉरमध्ये या मुलांचा वापर झाला. असंख्य मुले त्यात मारली गेली. गिरणी कामगारांचा 1982 साली सुरू झालेला संप कधीच संपला नाही. स्वान, मॉडर्न, रघुवंशी, कमला, मुकेश, श्रीनिवास, ब्रॅडबरी अशा 10 गिरण्या शेवटपर्यंत चालू होत्या. त्याही बंद झाल्यावर हाहाकार उडाला. मालकांनी गिरणी कामगारांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसेही दिले नाहीत. उलट त्यांना गिरण्यांच्या जमिनी खाली करून हव्यात म्हणून राहत्या घरातून काढले. यातून इस्वलकर व त्यांच्या सहकाऱयांनी बंद गिरणी संघर्ष समिती स्थापन केली. या समितीने अनोखी आंदोलने केली. गिरणी कामगारांच्या मुलांनी सरकारला पत्र लिहिणे, मुलांचा मोर्चा काढणे यामुळे सरकारवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव कायम राहिला. मात्र खरा लक्षवेधी ठरला होता तो तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मुंबई भेटीदरम्यान या समितीने काढलेला ‘चड्डी-बनियन’ मोर्चा. अशा विविध मार्गांनी गिरणी कामगारांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे कार्य इस्वलकरांनी आयुष्यभर केले. हतप्रभ, वाताहत झालेल्या गिरणी कामगारांना लढण्याचे बळ देण्यासाठी ते पायाला भिंगरी लावून फिरत राहिले. मालकांनी गिरण्यांच्या जमिनी विकू नयेत, विकणार असाल तर तेथे राबलेल्या गिरणी कामगारांना त्यातला वाटा मिळावा, घर तर मिळायलाच हवे, हा त्यांचा आग्रह होता. आजारी गिरण्यांच्या जमिनी विकून पैसा मिळविण्याचा मार्ग मालकांनी स्वीकारला. त्या व्यवहारात सगळय़ांचेच हात ओले झाले, पण गिरणी कामगारांची

ओंजळ रिकामीच

राहिली. जागतिकीकरण आणि खासगीकरणाचा फटका कापड उद्योगासही बसला. मुंबईतल्या गिरण्या बंद करून मालकांनी कापडाचे उत्पादन इतर राज्यांतून सुरू केले. इस्वलकर एकदा म्हणाले होते की, ‘‘गिरण्यांची अथवा कारखान्यांची जमीन विकणे हाच यामागचा हेतू आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे कधीकाळी एक रुपया वाराप्रमाणे खरेदी केलेल्या जमिनीची किंमत शंभरपट झाली आहे. ही किंमत मालकाच्या हाती लागेलच, शिवाय नव्या ठिकाणी ग्रामीण विकासाच्या नावाखाली कमी व्याजाचे कर्ज मिळते, वीज, पाणी, जमीन या बाबी मुंबईच्या मानाने स्वस्तात मिळतात. त्या त्या राज्य सरकारकडून कर सुविधाही मिळतात आणि नव्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केल्याने संप, आंदोलनाचीही भीती उरत नाही.’’ हे मुंबईतील गिरणी उद्योगाच्या बाबतीत खरे ठरले आहे. इस्वलकर या सगळय़ा उलाढालीस विरोध करीत राहिले. भायखळय़ाच्या न्यू ग्रेट मिलसमोर त्यांनी सहकाऱयांसह उपोषण केले. त्यातून गिरणी कामगारांना गिरण्यांच्या जमिनीवरच घरे देण्याचा निर्णय झाला. गिरण्यांच्या संपात होरपळलेल्या कामगारांच्या वारसांना त्यांनी घरासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय करून घेतला. त्यामुळे 15 हजार गिरणी कामगार व त्यांच्या वारसांना अल्प दरात घरे मिळाली. दत्ता इस्वलकर त्यांच्या सहकाऱयांसह एका ध्येयाने लढत राहिले. इस्वलकर म्हणजे कॉ. श्रीपाद अमृत डांगे, दत्ता सामंत यांच्याप्रमाणे महान लढवय्ये वगैरे नेते नव्हते. त्यांचा रुबाब आताच्या कामगार नेत्यांचा नव्हता. ते शिडशिडीत व फाटकेच होते, पण तीच त्यांची ताकद होती. त्यांना वादळाची उपमा देणेही योग्य नाही, पण इस्वलकर हे सोसाटय़ाच्या वाऱयाप्रमाणे होते. गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी जन्मभर वाहून घेतले. त्यादृष्टीने इस्वलकरांचा जन्म सार्थकी लागला. या झुंजार माणसाच्या स्मृतीस आदरपूर्वक अभिवादन! कामगारांच्या हक्कांचा लढा सुरूच ठेवणे ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!

 

आपली प्रतिक्रिया द्या