सामना अग्रलेख – पहिल्याच पावसात पोलखोल

पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई केली. ‘मुंबई तुंबणार नाही, थांबणार नाही’ ही तुमची गर्जना, 110 टक्के नालेसफाईचे दावे, त्यासाठी खर्च केलेले 250 कोटी रुपये पहिल्याच पावसात वाहून गेले. हा दोष फक्त पावसाचा नाही, तर तुमच्या ‘कट आणि कमिशन’ कारभाराचा आहे. म्हणून पहिल्याच पावसात तुमच्या कारभाराची पुरती पोलखोल झाली. मुंबईकरांना पोकळ आश्वासने देण्यापेक्षा नालेसफाईतील कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवा. मुंबईत तुंबलेल्या प्रत्येक थेंबाचा आणि नालेसफाईच्या भ्रष्टाचारात ‘बरबटलेल्या’ मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशेब द्या. मुंबईकरही तो तुमच्याकडून घेणार आहेतच. ती वेळ फार दूर नाही!

पावसाळय़ात मुंबईत पाणी तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही, अशी गर्जना राणा भीमदेवी थाटात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती. यंदाच्या पावसाळय़ात मुंबईकरांना अजिबात त्रास होणार नाही, असा दावाही केला होता. मात्र सोमवारच्या पहिल्याच पावसाने मुख्यमंत्र्यांच्या गर्जना तुंबलेल्या पाण्यात बुडविल्या. रविवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुंबई शहर आणि उपनगरांसह, ठाणे, पालघर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसाने राज्य सरकारच्या गैरव्यवस्थेची अब्रू वेशीवर टांगली. कमी वेळात झालेला प्रचंड पाऊस आणि त्याच वेळी आलेली भरती यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी नेहमीच्या सखल भागात पाणी साचले, अशी नेहमीची मखलाशी सरकारतर्फे केली गेली. तुम्हाला हेच तुणतुणे वाजवायचे होते तर मग ‘मुंबई तुंबणार नाही, मुंबई थांबणार नाही,’ अशा गर्जना तुम्ही का केल्या? मुंबईकरांना खोटी आश्वासने का दिली? सोमवारचा दिवस उजाडण्यापूर्वीच मुंबईसारख्या महानगराचे संपूर्ण दळणवळणच केवळ

चार-पाच तासांच्या पावसाने

कोलमडून पडले. हा तुमच्या पावसाळापूर्व कामांचा दर्जा. पहिल्याच पावसाने तुमचा गैरकारभार उघडय़ावर पाडला. लाखो सामान्य मुंबईकरांचे, चाकरमान्यांचे हाल झाले. अर्थात, तुम्हाला त्याच्याशी कुठे देणेघेणे आहे? आता म्हणे, सोमवारी ज्या भागात पाणी साचले त्या ठिकाणांचा पालिका अभ्यास करेल आणि तेथे पुन्हा पाणी साचणार नाही याची काळजी घेईल, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. हे ‘वरातीमागचे घोडे’ आता दामटून काय फायदा? पावसाळय़ापूर्वी झोपा काढायच्या आणि मुंबई तुंबली की जाग आल्याचे नाटक करायचे. नालेसफाई आणि मान्सूनपूर्व कामांचे दावे तर तुम्ही भरपूर केले होते. नालेसफाई 100 नव्हे तर 110 टक्के पूर्ण झाली असा भन्नाट दावा तुम्ही केला होता. गटारांची साफसफाई आणि मेनहोलची व्यवस्था यंदा खूप सुधारण्यात आली आहे, असेही तुम्ही म्हणाला होता. मुंबईत पावसाने जेथे पाणी जमा होते अशा ठिकाणी तब्बल 481 पंप बसविण्यात आले आहेत, अशा गमजा तुम्ही केल्या होत्या. पण तुमचे हे सगळे दावे सोमवारच्या पावसाने

तुमच्याच घशात

कोंबले. पाण्याचा निचरा करणारे पंप, पंपिंग स्टेशन्स आणि इतर आवश्यक यंत्रणा असूनही पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई केली. ‘मुंबई तुंबणार नाही, थांबणार नाही’ ही तुमची गर्जना, 110 टक्के नालेसफाईचे दावे, त्यासाठी खर्च केलेले 250 कोटी रुपये पहिल्याच पावसात वाहून गेले. हा दोष फक्त पावसाचा नाही, तर तुमच्या ‘कट आणि कमिशन’ कारभाराचा आहे, मुंबईकरांऐवजी मर्जीतल्या कंत्राटदारांवर असलेल्या तुमच्या प्रेमाचा आहे. नालेसफाई करण्याऐवजी ‘रेड कार्पेट’वर उभे राहून ‘फोटो’ काढत स्वतःला मिरविण्याचा आहे. तुम्हाला ना मुंबईबद्दल प्रेम आहे, ना मुंबईकरांबद्दल काही उत्तरदायित्व. म्हणून पहिल्याच पावसात तुमच्या कारभाराची पुरती पोलखोल झाली आणि त्याचा त्रास सामान्य मुंबईकरांना भोगावा लागला. त्याची जबाबदारी तुम्हाला झटकता येणार नाही. मुंबईकरांना पोकळ आश्वासने देण्यापेक्षा नालेसफाईतील कोटय़वधींच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची हिंमत दाखवा. मुंबईत तुंबलेल्या प्रत्येक थेंबाचा आणि नालेसफाईच्या भ्रष्टाचारात ‘बरबटलेल्या’ मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशेब द्या. मुंबईकरही तो तुमच्याकडून घेणार आहेतच. ती वेळ फार दूर नाही!