
2014 सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर 35 गोळय़ा झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हेसुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले. चिनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच!
पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना सांगितले की, कालच्या अर्थसंकल्पामुळे गरीब लखपती बनले आहेत, मालामाल झाले आहेत. भाजपचे कार्यकर्ते मोदींच्या भाषणावर टाळय़ा वाजवतील, त्यांचा जयजयकार करतील. नव्हे, तसा तो केलाच. हे नवलखपती नक्की कुठे आहेत? पंतप्रधान मोदी म्हणतात, पंतप्रधान घर योजनेत तीन कोटी गरीबांना घरे देऊन सात वर्षांत लखपती बनवले. म्हणजे पंतप्रधानांनी गरीबांचे पैसे इस्टेटीत गुंतवले आहेत. त्याचवेळी लोकसभेत राहुल गांधी यांनी मोदींच्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली आहे. मोदी यांनी दोन हिंदुस्थान बनवले. एक श्रीमंतांचा हिंदुस्थान आणि दुसरा धनदांडग्यांचा हिंदुस्थान. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीवर एका शब्दाचाही उल्लेख नाही. याचा अर्थ देशातल्या बेरोजगारीचे उच्चाटन झाले असे नाही. सात कोटी बेरोजगार वाढले असून ते गरिबी रेषेच्या खाली आहेत. 84 टक्के देशवासीयांचे उत्पन्न घटले आहे आणि ते वेगाने गरिबीकडे घसरत आहेत. श्री. गांधींचा असा दावा आहे की, यूपीएच्या काळात 27 कोटी गरीबांचे जीवनमान उंचावले, पण मोदी सरकारच्या काळात 23 कोटी लोक पुन्हा गरिबीच्या खाईत ढकलले गेले, असे श्री. गांधी यांनी सांगितले. गांधी हे विरोधी पक्षांचे एक प्रमुख नेते आहेत. विरोधकांच्या भाषणाच्या वेळी पंतप्रधानांनी उपस्थित राहावे असे संकेत आहेत. पंडित नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सगळय़ांनीच ही परंपरा पाळली आहे. अटलजींच्या सरकारविरोधी भाषणाचे पंडित नेहरूंनी कौतुक केले आहे. बॅ. नाथ पैंच्या भाषणाच्यावेळीही नेहरू हजर राहत. मधू लिमये, मधू दंडवते यांच्या भाषणात सत्तापक्षाने व्यत्यय आणला नाही. पिलू मोदी हे इंदिरा गांधींच्या सरकारचे वाभाडे काढत, पण भाषण संपताच इंदिरा गांधी लगेच पिलू मोदींना एक चिठ्ठी पाठवून भाषणाचे कौतुक करीत असत. आता ते
दिलदारीचे वातावरण
संपले आहे. राहुल गांधी यांच्या कालच्या टोकदार भाषणावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तुच्छतेच्या भाषेत टीका केली आहे. सरकार पक्षाचे इतर प्रवक्तेही त्यांच्या पगारी सायबर फौजेसह गांधींवर तुटून पडले आहेत. पंतप्रधान घर योजनेतून गरीबांना घरे दिली, शौचालये बांधली. ही सरकारची कामेच आहेत. गेल्या 70 वर्षांत हे काम होतच राहिले. आज शंभर लोकांकडे देशातील 30 टक्के संपत्ती आहे. हे शंभर लोक कोण आहेत? या शंभर लोकांनी त्यांची संपत्ती वाढवली, पण देशात किती रोजगार वाढवले? याच शंभर लोकांच्या मालकीची देशाची विमानतळे, बंदरे, तेल कंपन्या, शेती उद्योग आहेत. विमानतळांवर आज आपल्या शहरांचे किंवा देशाचे नाव दिसत नाही, तर या उद्योगपतींचे नाव दिसते. राहुल गांधींनी यावर प्रश्न उपस्थित केला तर त्यांच्यावर घाणेरडय़ा शब्दांत टीका करायची. बिहारात रेल्वे भरतीत लाखो बेरोजगार तरुण रस्त्यावर आले, उत्तर प्रदेशातही तेच घडले. बेरोजगारांना बेदम चोप देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तुमच्याकडे काय उपाययोजना आहेत ते सांगा. विरोधी पक्षनेत्याने हा प्रश्न विचारला तर सरकारने उत्तर द्यावे. विरोधक मूर्ख आहेत असे म्हणू नये. देशातील जनतेचे 15 हजार कोटी रुपये मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअर खरेदी करण्यासाठी वापरले. ही उधळपट्टी म्हणजे देशद्रोह आहे, पण विरोधकांना यावर संसदेत बोलू दिले जात नाही. सरकारच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच देशद्रोह असा नवा फंडा तयार झाला आहे. पाकिस्तान व चीन हे हिंदुस्थानविरोधात एकत्र आले आहेत हा देशाला मोठा धोका आहे. दोन दुश्मनांना एकत्र येण्याची संधी मोदी सरकारने दिली, असा दावा गांधी करतात तेव्हा त्यास आधार आहे. लडाखमध्ये चीन घुसले आहे, ते माघार घ्यायला तयार नाही. पाकिस्तानचे छुपे हल्ले संपले नाहीत व
आता चीनने पाकिस्तानला
उघड पाठिंबा दिला. हे आपल्यासाठी धोकादायक आहे. राहुल गांधी यांनी हे सर्व संसदेच्या व्यासपीठावर सांगितले व त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते त्यांना चीनचे एजंट ठरवू लागले. या मूर्खपणास काय म्हणायचे! मोदी सरकारकडे विस्मरणाची कला आहे, पण सत्य ऐकून घेण्याचे इंद्रिय त्यांच्यापाशी नाही. 2014 च्या प्रचारात दिलेली वचने सरकारच्या स्मरणात नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख, महागाई खतम करणार, इन्कम टॅक्स भरावा लागणार नाही. पाकव्याप्त कश्मीर पुन्हा परत आणणार, दोन कोटी बेरोजगारांना प्रत्येक वर्षी नोकऱ्या या वचनांची आठवण करून देणारे राष्ट्रद्रोही ठरवले जातात. 2014 सालीच देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी पंधरा वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी शरीरावर 35 गोळय़ा झेलल्या. माझे वडील राजीव गांधी हेसुद्धा देशासाठीच हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? मला माझा देश चांगला माहीत आहे, असा तीर राहुल गांधींनी सोडला व त्यामुळे सत्ताधारी घायाळ झाले. देशासाठी बलिदान, रक्त सांडणे, त्याग वगैरे गोष्टींशी सध्याच्या दिल्लीतील राज्यकर्त्यांचा संबंध राहिलेला नाही. दोन-पाच उद्योगपतींभोवतीच देशाचे चक्र फिरते आहे. सरकार म्हणजे काय? याचा विसर पडला आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच जणू मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. पुलवामा घडले ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांना संरक्षण व्यवस्थेची मोठी चूक वाटत नाही. हे का घडले? असे विचारणारे पाकचे एजंट ठरविले जातात. चिनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच!





























































