रोखठोक – दुश्मन टाळ्या वाजवतोय!

मुंबईत दसऱ्याचे दोन मेळावे झाले. तेही शिवसेनेच्याच नावाने. या फुटीचे दर्शन अस्वस्थ करणारे आहे. शिंदे यांच्या मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी प्रचंड खर्च झाला. तरीही गर्दी जिवंत होत नव्हती, असे प्रसिद्ध झाले आहे. शिंदे यांनी हा धोका वेळीच ओळखायला हवा, पण राज्यात जे घडत आहे ते पाहून दुश्मन टाळ्या वाजवतोय.

मुंबईसह महाराष्ट्रातील दसरा मेळाव्याचे कवित्व अद्याप संपलेले नाही. महाराष्ट्रात परंपरेने दोन दसरा मेळावे होत आले. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आणि मेळावा पहिला. शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे घेत असलेला दसरा मेळावा दुसरा. त्यानंतर गोपीनाथ मुंडे भगवान गडावर एक मेळावा घेऊ लागले. तोदेखील दसऱ्यालाच. आता आणखी एक चौथा मेळावा मुंबईतील ‘बीकेसी’ मैदानात पार पडला. मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या गटाने शिवसेनेला आव्हान देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले. त्यांच्या मेळाव्यासही चांगली गर्दी झाली. शिंद्यांचे प्रमुख भाषण झाले ते उद्धव ठाकरे यांच्यावर पूर्णपणे चिखलफेक करणारे. शिवतीर्थ विरुद्ध बीकेसी असा हा सामना पाहून महाराष्ट्राचे दुश्मन दिल्लीत बसून आनंदाने टाळ्या वाजवीत असतील. महाराष्ट्रासाठी हे चित्र चांगले नाही. भारतीय जनता पक्षाला 30-35 वर्षांत जमले नाही ते श्री. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात करून घेतले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरही दसरा मेळावे झाले व दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत त्या एकाच दसरा मेळाव्याचा मोठा वृत्तांत प्रसिद्ध होत असे.  मात्र यावेळी पहिल्या पानावर प्रथमच शिवसेना म्हणून दोन दसरा मेळाव्यांच्या गर्दीची छायाचित्रे व बातम्या प्रसिद्ध झाल्या. श्री. शिंदे हे आजही स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार समजत असतील तर त्यांनी या विषयाचे चिंतन केले पाहिजे. शिंदे त्यांच्या मेळाव्यातील भाषणात म्हणाले, ‘‘मी सत्यासाठी लढतोय. सत्तेसाठी नाही.’’ मुळात सत्य असे आहे की, भारतीय जनता पक्ष त्यांचे राजकीय डाव खेळत आहे व शिंदे यांना केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून ठाकऱ्यांच्या विरोधात वापरून घेत आहे.

हा वृत्तांत पहा…

शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास गर्दी नेहमीच होत असते, पण श्री. शिंदे यांनीही बीकेसीतील त्यांच्या मेळाव्यास गर्दी गोळा केली. गर्दीचे व्यवस्थापन व त्यासाठीचे अर्थकारण त्यांनीही जमविले व त्यात ते यशस्वी झाले. शिंदे यांच्या मेळाव्यास जमलेल्या गर्दीचे सत्य ‘लोकसत्ता’ व इतर दैनिकांनी मांडले. ‘लोकसत्ता’ म्हणजे ‘सामना’ नाही. म्हणून त्यांचा वृत्तांत काय सांगतोय ते पहा-

‘‘वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून आयोजित दसरा मेळावा झाला. या मेळाव्यास अलोट गर्दी झाली होती. मात्र या गर्दीमधील बहुसंख्य जण मुंबई पाहण्यासाठी आल्याचे निदर्शनास आले. मुंबई पहिल्यांदाच पाहतोय अशी भावना मैदानात जमलेल्या अनेकांनी व्यक्त केली.

बुधवारी सकाळपासून राज्यासह देशातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी जमत होती. मात्र या गर्दीच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून येत होती. आपण कशासाठी आलो आहोत, कुठे फिरत आहोत, पुढे काय होणार आहे याची काहीही माहिती त्यांना नव्हती. तर आम्ही एकनाथ शिंदे यांचे विचार ऐकण्यासाठी आलो आहोत. हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आलो आहोत, असे काही कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलात कार्यकर्त्यांची रेलचेल सुरू होती. मात्र सकाळपासून कोणतीही जोरदार घोषणाबाजी, जयजयकार झाला नाही. कोणाच्याही भाषणाला शिट्टय़ा, टाळ्या वाजण्याचे प्रमाण कमी होते. मुख्यमंत्री शिंदे व्यासपीठावर आल्यावर काही प्रमाणात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी झाली. परंतु त्यानंतर जैसे थे परिस्थिती निर्माण झाली. ‘लोकसत्ता’ने अनेकांना विचारले तेव्हा सांगण्यात आले, ‘‘सत्तार शेठने मुंबईत फिरायला पाठवले आहे. मुंबई फिरतोय. सभेविषयी माहिती नाही.’’ एकाने सांगितले, ‘‘राज ठाकरेंच्या सभेसाठी आणलंय.’’ तर अनेकांना शिंदे यांची सभा आहे हे माहीतच नव्हते.

शिंदे हे हिंदुत्वाचा विचार टिकवून ठेवणार असे म्हणतात. म्हणजे ते काय करणार? मोदी-शहांना शिवसेना फोडायची होती. हिंदुत्वाच्या मतांत आणि विचारांत वाटेकरी नको म्हणून शिवसेनेसह इतर हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांना खतम करायचे. शिंदे यांना त्यासाठी वापरले गेले. ईडी कार्यालयात गेल्यावर अनेकांचे हिंदुत्व कसे जागरुक होते, असे एक व्यंगचित्र मध्यंतरी गाजले. शिंदे व त्यांच्या लोकांचे हिंदुत्व त्याच पद्धतीने जागरुक झाले. त्यामुळे बीकेसीवर गर्दी होती, पण उत्साह नव्हता हे समोर आले. तरीही महाराष्ट्राचे राजकारण या सगळ्या प्रकारामुळे चिखलात अडकले. मराठी माणसांची एकजूट तुटत आहे. शिंदे यांच्या पाठीशी आज भाजपचे जे बळ आहे ते शिवसेना फोडण्यासाठी आहे, याचे भान त्यांना आहे काय?

ठाकरे कुटुंब

शिंदे गटाच्या मेळाव्यात ठाकरे कुटुंबातील काही सदस्य बोलावण्यात आले व ‘ठाकरे कुटुंब’देखील आपल्यासोबत असल्याचा आभास निर्माण केला. व्यासपीठावरील त्या प्रत्येक पात्राचा परिचय श्री. शिंदे यांना आहे व त्यामागचे सत्यही ते जाणतात. हा कौटुंबिक विषय आहे. बाळासाहेबांच्या पार्थिवास अग्नी देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी चंपा थापा व रवी म्हात्रे यांना सर्वात पुढे केले होते. अंत्यसंस्काराचे विधी थापा व म्हात्रे यांच्याकडूनच करून घेतले. याबद्दल तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या दिलदारीचे कौतुक झाले. आज ‘थापा’ शिंदे गटाच्या व्यासपीठावर का गेले? आजही ‘मातोश्री’वर निष्ठsने असलेल्या रवी म्हात्रेंकडून शिंदे व त्यांच्या लोकांनी ते समजून घेतले पाहिजे. शिंदे यांच्या खुर्चीमागेच ‘इव्हेन्ट’ व्यवस्थापकाने थापास उभे केले. जणूकाही शिंदे हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. या सर्व ढोंगबाजीचा पर्दाफाश बीकेसीच्या मेळाव्यात झाला व शिंदे यांची झाकली मूठ उघड झाली. भाजपलाही तेच हवे असावे!

2014 का विसरता?

‘बीकेसी’च्या सभेत श्री. शिंदे यांनी नक्की कोणता विचार दिला? चिखलफेक हा विचार नसतो. मग तो शिवतीर्थ असो नाहीतर शिंद्यांचे मैदान. सध्याच्या मीडियाला ही चिखलफेक हवीच असते. शिंदे यांच्या व्यासपीठावरील अर्धे लोक काँग्रेस-राष्ट्रवादीच्या गोठय़ात यथेच्छ लोळून आले आहेत. त्यांनी हिंदुत्वाचा वगैरे विचार मांडावा ही गंमत आहे. या सगळय़ांना हाताशी धरून भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर वार करीत आहे. उद्या तीच तलवार शिंदे यांच्यावरही चालवली जाईल. मेहबुबा मुफ्तीशी युती करून सत्ता भोगण्यापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीशी सहकार्य करणे नक्कीच चांगले. शिंदे यांना हा इतिहास माहीत नाही काय? शिंदे भाजपच्या सोयीचे बोलतात. गद्दारी 2019 साली झाली असे ते म्हणतात, पण 2014 साली भाजपने काय केले, याचा विसर त्यांना पडतो. मुंबईतील दोन दसरा मेळाव्यांनी महाराष्ट्रातील उभ्या फुटीचे दर्शन जगाला घडविले. शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा हा दुश्मनांच्या डोळय़ांत खुपतच होता. त्या मेळाव्याचे ‘तेज’ कमी करण्यासाठी बीकेसी मैदानात आणखी एक मेळावा घ्यायला भाग पाडले गेले. लोकांनी हे सगळे बुधवारी अनुभवले. मात्र बीकेसीवरील मेळावा म्हणजे विझलेल्या काजव्यांची गर्दी होती, असे सर्वत्र प्रसिद्ध झाले. तरीही मुंबईतील दोन मेळावे पाहून दुश्मन टाळ्याच वाजवीत असेल!

[email protected]