
‘लॅक्मे’ या ब्रॅण्डच्या नावाखाली सौंदर्य प्रसाधनांची बोगसगिरी करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका दुकान चालकाला आर्थिक गुन्हे नियंत्रण पथकाने दणका दिला. पोलिसांनी पायधुनी येथील दुकानात छापा टाकून साडेतेरा लाख किमतीचा बनावट सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त केला.
पायधुनी येथे एका दुकानात लॅक्मे या ब्रॅण्डच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने विकून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार सी.बी. कंट्रोल पथकाकडे करण्यात आली होती. त्याची तत्काळ दखल घेत प्रभारी निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपेश दरेकर, एकनाथ शिंदे तसेच महेश नाईक, गणेश डोईफोडे, संतोष पाटील, भंडारी, खारवे, शेडगे, कुंभार, मगर या पथकाने गुरुवारी त्या पथकावर छापा टाकला. त्या वेळी अस्लम युसूफ शेख (26) हा बनावट सौंदर्य प्रसाधने विकताना रंगेहाथ सापडला. पोलिसांनी त्याला व 13 लाख 35 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी त्यांना पायधुनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.



























































