वडाळय़ाच्या मिठागरांचे झाले डंपिंग ग्राऊंड, मुंबईत दरवर्षी 34 लाख मेट्रिक टन डेब्रिज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वाढत्या बांधकामामुळे निर्माण होणाऱया 34 लाख मेट्रिक टनची विल्हेवाट लावण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मोकळ्या जागा नसल्याने सध्या वडाळ्याच्या मिठागरांच्या जमिनींचे रुपांतर डेब्रिजच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये झाले आहे. सॉल्ट पॅन कमिशन, जिल्हाधिकारी व पालिकेत समन्वय नसल्याने डेब्रिज फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. मिठागराच्या जमिनींवरील डेब्रिज हटवण्याचे आदेश हरित लवादाने राज्याच्या पर्यावरण खात्याला दिले आहेत.

वडाळा येथील मिठागरांच्या जमिनींवरील अतिक्रमाणाचा मुद्दा एका याचिकेमुळे राज्याच्या पर्यावरण खात्याच्या निदर्शनास आला. मिठागरांच्या जमिनीवरील अतिक्रमणांच्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मधुरा तावडे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली होती. त्यावरील सुनावणीत अनेक मुद्दे पुढे आले. मुख्य म्हणजे मुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱया डेब्रिजचा मुद्दा पुढे आला. मुंबईत जानेवारी ते डिसेंबर 2020 या काळात तब्बल 32 लाख 58 हजार 548 मेट्रिक टन डेब्रिज गोळा झाल्याची आकडेवारी आहे. यामध्ये राज्याच्या पर्यावरण विभागाला प्रतिवादी केले आहे.

> हरित लवादाकडे झालेल्या सुनावणीत या सर्व मुद्दय़ांवर चर्चा झाली. वडाळा मिठागराच्या जमिनीवर टाकलेली डेब्रिज हटवण्याचे आदेश लवादाने राज्याच्या पर्यावरण खात्याला दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ही मुदत जून महिन्यात संपुष्टात येत आहे.

> डेब्रिज हटवण्याचे काम खूप खर्चिक आहे. त्यामुळे हा खर्च नेमका कोणी करायचा हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मिठागरांच्या जमिनी ज्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. त्यांच्याकडून खर्च वसूल करावा अशी शिफारस पर्यावरण खात्यातर्फे करण्यात येणार आहे. डेब्रिजकडे सॉल्ट कमिशन कार्यालयाने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावरही कारवाईची शिफारस केली जाणार आहे.

सॉल्ट कमिशनरचे दुर्लक्ष
वास्तविक मिठागरांच्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये याची जबाबदारी सॉल्ट कमिशनची आहे. पण मिठागरांच्या जमिनींवर डेब्रिज टाकण्याच्या प्रकाराकडे या खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची बाब पुढे आली आहे. सॉल्ट कमिशनरची जागा असल्याने पालिका अधिकारी व जिल्हाधिकारी दुर्लक्ष करतात असे पर्यावरण खात्यातील अधिकाऱयांचे म्हणणे आहे.

> मुंबई मोठय़ा प्रमाणावर इमारतींची बांधकामे सुरू आहेत. जुन्या इमारती व बांधकामे तोडल्यावर निर्माण होणाऱया डेब्रिजची विल्हेवाट कशी लावायची याची मार्गदर्शक तत्त्वे कन्स्ट्रक्शन अॅण्ड डिमॉलिशन बेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत निश्चित केली आहे. त्यानुसार डेब्रिजची बारीक खडी करून योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागते.

> पाणथळ जागा, मँग्रोव्ह, जलाशय अशा पर्यावरणाचा समतोल साधणाऱया जागांना कोणतेही नुकसान पोहोचता कामा नये असे स्पष्टपणे नमूद केले आहे. वास्तविक या जमिनी काही व्यक्तींना मिठागरांसाठी दिलेल्या आहेत. पण मिठगरांपेक्षा डेब्रिजच्या डंपिंग ग्राऊंडमधून अधिक उत्पन्न मिळत आहे.