
नगर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या रक्तचंदन प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यातील एकजण अजूनही फरार आहे. विठ्ठल बबन झावरे (रा. वासुंदे, ता. पारनेर) आणि संतोष माने (रा. सावरगाव, ता. पारनेर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर लक्ष्मण गणपत शिर्के हा अद्याप फरार आहे.
एमआयडीसी परिसरात एका गोदामात साठविलेले चार कोटींचे रक्तचंदन पोलिसांनी जप्त केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. यातील गोदाम मालकाला पोलिसांनी कारवाईवेळीच अटक केली आहे. गुह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना बुधवारी पहाटेच्या दरम्यान पनवेल (मुंबई) येथून ताब्यात घेत अटक केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.
आरोपी झावरे आणि माने गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाले होते. एमआयडीसी पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत असताना ते पनवेल येथील एका लॉजवर थांबल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने आरोपी विठ्ठल झावरे आणि संतोष माने या दोघांना अटक केली.
























































