‘स्वच्छ संगमनेर… सुंदर संगमनेर… हरित संगमनेर’च्या बाता, प्रशासकांच्या बंगल्याबाहेरच कचरा कुंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्वच्छ संगमनेर… सुंदर संगमनेर… हरित संगमनेर’च्या बाता मारणाऱ्या संगमनेर नगरपरिषदेचे पितळ दिवसेंदिवस उघडे पडत चालले आहे. शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरच कचराकुंड्या झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आता मात्र कहरच झाला असून, नगरपालिकेचे प्रशासक तथा प्रांताधिकाऱ्यांच्या शासकीय बंगल्याशेजारीच कचराकुंडी तयार झाल्याचे समोर आले आहे.

संगमनेर नगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यापासून सार्वजनिक स्वच्छता, सुविधा, आरोग्याची मोठी हेळसांड होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बऱ्याच ठिकाणी कचराकुंड्या तयार झाल्या आहेत. स्वच्छतेचा अभाव आहे. नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. शहरात घंटागाड्या फिरत असूनही काही भागात थेट कचराकुंड्या निर्माण झाल्याने नगरपालिकेचा स्वच्छतेचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे.

संगमनेर शहरालगतच असणाऱ्या एका बड्या हॉस्पिटलशेजारी गुंजाळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे छोटेसे डम्पिंग ग्राउंड तयार झाल्याचे उघड झाले होते. हे डम्पिंग ग्राउंड नव्याने तयार झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याची माहिती समजली आहे. ग्रामपंचायत मोठ्या थाटामाटात निर्माण केली. मात्र, ग्रामपंचायत आपले कर्तव्य किती प्रमाणात पार पाडते हे आता दिसून आले आहे. त्यानंतर संगमनेर शहरात प्रवेश करताना जुन्या पुणे-नाशिक महामार्गालगत कचराकुंडी झाल्याचे उघडकीस आले होते.

पावसामुळे शहरात असणाऱ्या उंच सखल भागात आणि रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून गढूळ पाण्यामुळे दुर्गंधी येत आहे. शहरातील काही कोपऱ्यांमध्ये कचऱ्याचे छोटे-छोटे ढीग टाकण्यात आलेले आहेत. ‘ओला कचरा, सुका कचरा’ हा फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर नगरपालिकेला स्वच्छतेबाबतचा राज्य, राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेला आहे. या पुरस्काराचे वाटोळे करण्याचे काम प्रशासन अगदी जोरदारपणे करत आहे.

हे सगळे होत असतानाच इंदिरानगर परिसरात प्रांताधिकाऱ्यांचा शासकीय बंगला आहे. या बंगल्याशेजारीच कचरा उघड्यावर टाकला जात आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे हे सध्या संगमनेर नगरपरिषदेचे प्रशासक आहेत. मात्र, त्यांच्याच बंगल्याशेजारी हा कचरा कुणी टाकला, याकडे कोणाचे लक्ष नाही. नगरपालिकेची घंटागाडी येथे येते की नाही, कचरा उचलण्यासाठी किंवा सफाई करण्यासाठी कोणी कामगार येतात की नाही, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.