
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली त्या सहा अपक्ष आमदारांची नावे आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला, असा आरोप शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज केला.
राज्यसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, देशातील पेंद्रीय तपास यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली कशा प्रकारे काम करतात ते दिसत आहे. ईडी, सीबीआयचा वापर होतो हे पाहिले आहे. ज्या कारणासाठी शिवसेनेचे सुहास कांदे यांचे मत बाद केले अशाच प्रकारचा आक्षेप आम्ही भाजपवर घेतला होता, पण निवडणूक आयोगाने त्यांची मते बाद केली नाहीत. त्यामुळे तर आता अशा प्रकारच्या निवडणूक आयोगाच्या यंत्रणा वापरल्या जातात का, अशी शंका येते असे संजय राऊत म्हणाले.
जनतेने दखल घेतली
या निवडणुकीत भाजपने दिल्लीची तसेच निवडणूक आयोग व पेंद्रीय तपास यंत्रणांची ताकद वापरून घोडेबाजाराला उत्तेजन दिले. महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासला. या सर्व गोष्टींची नोंद सरकार व जनतेने घेतली आहे.
आम्ही व्यापार केला नाही
अपक्षांची सहा मते मिळाली नाही, पण असे लोक कोणाचेच नसतात. पण महाविकास आघाडीसोबतचे आमचे जे घटक व छोटे पक्ष आहेत त्यांचे एकही मत फुटले नाही, असे त्यांनी सांगितले. पण घोडेबाजारातील सहा-सात मते मिळू शकली नाहीत. कारण आम्ही त्यांच्या व्यवहारात पडलो नाहीत. आम्ही व्यापार केला नाही.
घोडेबाजारातल्या घोडय़ांमुळे महाराष्ट्रातील सरकारला धोका होणार नाही. हरभरे टाकल्यावर घोडे कुठेही जातात. फार हरभऱयाच्या झाडावर चढू नका.
पहाटेला भाजपची पापकृत्ये
प्रत्यक्ष मतदान करीत असताना कोणत्याही प्रकारचे धार्मिक प्रदर्शन करायचे नसते हे माहिती असताना अपक्ष आमदार रवी राणा यांनी जे उद्योग केले ते आक्षेपार्ह होते. त्यांचे मत घटनेनुसार बाद व्हायला पाहिजे होते, पण फक्त आमचे मत पहाटेच्या काळात बाद केले. कारण पहाटेच्या काळात पापकृत्य करण्याची भाजपला सवय आहे, असा सणसणीत टोला त्यांनी भाजपला मारला.





























































