मुंबईत पावसानंतर उन्हाचे चटके!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संपूर्ण मे महिना तीव्र उन्हाचे चटके सहन केलेल्या मुंबईकरांना रविवारी पावसाने ‘मान्सून’ची हूल दिली. पहाटे सरींवर सरी कोसळलेला पाऊस काही मिनिटांतच ‘थंडावला’. मात्र कमी वेळेत दमदार हजेरी लावल्याने शहरातील काही भागांत पाणी साचले. दुपारी पुन्हा कडक उन्हाचे चटके बसायला लागले. दक्षिण मुंबईसह चेंबूर, दादर, कुर्ला, घाटकोपर तसेच पश्चिम उपनगरात वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बोरिवली भागात जोरदार पाऊस झाला.

राज्यातील वातावरणात विचित्र बदल झाला आहे. रविवारी काही भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडला, तर काही भागांत तीव्र उष्णतेची लाट कायम आहे. ग्रामीण भागासह मुंबईसारख्या शहरी भागातही उष्णतेची तीव्रता वाढली आहे. नागरिकांना कडक ऊन, प्रचंड लाहीलाही सहन करावी लागत आहे. मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असतानाच रविवारी पहाटे पावसाच्या सरींवर सरी कोसळल्या. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे 5 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास मान्सूनपूर्व पाऊस कोसळला. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, पवई, मालाड, कांदिवली परिसरात पावसासोबत सोसाट्याचा वारादेखील सुटला. काही मिनिटांच्या हजेरीत शहर आणि उपनगरांतील अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. त्याचा परिणाम सकाळी नऊ वाजेपर्यंत दिसला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने नोकरदारांची गैरसोय टळली. मात्र सुट्टीत फिरण्याचा बेत आखलेल्या मुंबईकरांचे ‘प्लॅनिंग’ बिघडले. पाऊस सुरू असेपर्यंत हवेत थंडावा निर्माण झाला होता. रात्रभर उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या हजेरीनंतर काहीसा दिलासा मिळाला. मात्र आठनंतर कडक उन्हाचे चटके बसू लागल्याने पुन्हा मुंबईकरांची लाहीलाही होऊ लागली. पाऊस थांबल्यानंतर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आणि मुंबईकर संपूर्ण दिवसभर घामाच्या धारांनी भिजले.

पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस

रविवारी पावसाने ‘मान्सून’सारखे वातावरण निर्माण केले. मात्र काही वेळातच पाऊस थांबल्याने उकाड्याने त्रस्त मुंबईकरांची निराशा झाली. याचदरम्यान हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा अलर्ट जारी केला आहे. सोमवारी व मंगळवारी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाचे वादळी वारे वाहतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 1 जूनच्या दुपारनंतर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खान्देशात हवामानात मोठे बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होईल. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडेल. तसेच कोकण किनारपट्टी भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असे भाकीत हवामान खात्याने केले.

चेंबूरमध्ये सर्वाधिक 27 मिमी पाऊस

मान्सूनपूर्व पावसाचा उपनगरांत जास्त जोर होता. पालिकेच्या नोंदीनुसार पूर्व उपनगरात 5 मिमी, पश्चिम उपनगरात 2 मिमी, तर शहर परिसरात 0.61 मिमी पाऊस पडला. चेंबूरमध्ये सर्वाधिक 27 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ मानखुर्द आणि वांद्रे कुर्ला संकुलमध्ये 22 मिमी, सांताक्रुझमध्ये 17 मिमी, घाटकोपरमध्ये 11 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. दुपारच्या कडक उन्हामुळे शहराचा पारा 35 अंशांच्याच घरात राहिला.

महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन नाही!

महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने रविवारी जाहीर केले. मान्सून अद्याप केरळमध्येच दाखल झालेला नाही. त्यामुळे त्याचा महाराष्ट्रापर्यंतचा प्रवास लांबला आहे. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे. सोमवारपासून काही भागांत वादळी पाऊस पडेल. त्याचा मान्सूनशी काहीही संबंध नसेल, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले.