जालनाला निघालेला भंगाराचा ट्रक सुरतला पळवला; दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालकीचा ट्रक मिळेल या लालसेपोटी एका चालकाने यूपीतल्या भामटय़ांना साडेपाच लाखांचे भंगार चोरून नेण्यास मदत केली. जालनाला भंगार विकून देतो सांगून त्याने ट्रक सुरतला नेला आणि अन्य आरोपींना तो दिला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी चालक आणि गुह्यातील आणखी एका आरोपीला अटक केली.

रशिद खान (26) याचा कुर्ला येथे भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. फैसल मुतल्लिफ या चालकाने रशिदला त्याचे भंगार जालना येथे विकून देतो असे सांगितले. त्यामुळे रशिदने साडेपाच लाखांचे भंगार घेऊन जाण्यास फैसलला सांगितले. ठरल्याप्रमाणे फैसल ट्रक भरून भंगार घेऊन निघाला. कुर्ला सोडल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर फैसलने ट्रकची नंबर प्लेट बदलली आणि जालनाला निघालेला ट्रक फैसल सुरतला घेऊन गेला. त्यानंतर अनिस खान आणि अक्रम नावाच्या आरोपींनी भंगाराने भरलेला ट्रक सुरतला ताब्यात घेतला आणि ते भंगार दुसरीकडे विकले. आपले भंगार चोरीला गेल्याचे समजताच रशिदने कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र होवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कुलदीप व्हटकर व पथकाने तपास सुरू केला. रशिदकडून भंगार घेऊन जाणाऱया फैसलला यूपीच्या प्रतापगडला जाऊन पोलिसांनी पकडले. त्यानंतर सुरतमधून अनिस खान याला पकडले.

अक्रम आणि अनिस हे या गुह्याचे मास्टरमाइंड आहेत. या दोघांनी फैसलला त्याने खरेदी केलेल्या ट्रकचे थकलेले पैसे भरतो असे सांगितले. मोबदल्यात भंगार आणून देण्यास सांगितले. त्यानुसार फैसलने रशिदकडून साडेपाच लाखांचे भंगार घेऊन ते अक्रम आणि अनिसला आणून दिले होते. कुर्ला पोलीस अक्रमचा शोध घेत असून त्यांनी विकलेले भंगार हस्तगत करण्याचे काम सुरू  आहे.