
कॉलेजियमने जाहीर केली आक्षेप घेणाऱया सदस्यांची नावे
सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची निवड प्रक्रिया वादात सापडली आहे. सरन्यायाधीश उदय लळीत यांनी शिफारस केलेल्या नावांवर व त्यासाठी अवलंबलेल्या ’सर्क्युलेशन मेथड’वर कॉलेजियममधील दोघा सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे, कॉलेजियमने संबंधित सदस्य असलेल्या दोन्ही न्यायमूर्तींची नावे सोमवारी जाहीर केली. त्यामुळे कॉलेजियममधील सदस्यांच्या मतभेदांचा गुंता आणखीन वाढला आहे.
सरन्यायाधीशांनी ’सर्क्युलेशन मेथड’ने चार न्यायमूर्तींच्या नावांची शिफारस केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या चार रिक्त पदांबाबत दीर्घकाळ काळापासून चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर 26 सप्टेंबरला सायंकाळी झालेल्या पहिल्या बैठकीत 11 न्यायमूर्तींच्या नावांबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली होती. त्या बैठकीला न्यायमूर्ती चंद्रचूड उपस्थित राहू शकले नव्हते. त्यांनी त्या रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुनावणी घेतली होती. नंतर सरन्यायाधीश लळीत यांनी कॉलेजियममधील चारही सदस्यांची न्यायमूर्ती निवड प्रक्रियेतील उमेदकारांच्या नावांकर लेखी मते मागवली. त्यावर दोन सदस्यांनी उमेदवारांच्या नावाबाबत सहमती दर्शवली, तर दोन सदस्यांनी उमेदवारांच्या नावासह निवड प्रक्रियेच्या ’सर्क्युलेशन मेथड’वर आक्षेप घेतला. त्यानंतर कॉलेजियमने सोमवारी आक्षेप घेणाऱया न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्यायमूर्ती नाझीर यांची नावे जाहीर केली. त्यामुळे कायदेजगतात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कॉलेजियममध्ये हे आहेत सदस्य
सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियममध्ये न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती एस. अब्दुल नाझीर, न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.




























































