काँग्रसचे ज्येष्ठ नेते  जयप्रकाश छाजेड यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार जयप्रकाश छाजेड (76) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. बुधवारी रात्री शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. छाजेड यांच्या पश्चात पत्नी माजी उपमहापौर शोभाताई, मुलगा आकाश, प्रितीश, आशीष, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नाशिकमधून सुरुवातीच्या काळात युवक काँग्रेसपासून त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. पन्नास वर्षे ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. जिल्हा काँग्रेससह प्रदेश व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी पक्षाची विविध पदे भूषविली. एस. टी. कामगार संघटनेत त्यांनी काम केले, इंटकच्या प्रदेशाध्यक्षपदीही ते होते. सन 2008 ते 2014 या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. मंगळवारी रात्री त्यांचे नाशिकमध्ये निधन झाले. माजी मंत्री अमित देशमुख, डॉ. शोभा बच्छाव, उल्हास पवार, आमदार सुधीर तांबे, बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड आदींनी छाजेड यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली. अंत्ययात्रेत सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, तसेच सामाजिक व विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. रात्री त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.