एअर कार्गोतील वरिष्ठ उपाध्यक्षांवर अज्ञातांचा हल्ला; लाकडी बांबू, लोखंडी रॉडने मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सहार येथील एअर कार्गोत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले मनोजकुमार सिंग (47) यांच्यावर सहा अज्ञातांनी भर रस्त्यात हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी मनोजकुमार यांची कार अडवली व लाकडी बांबू आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. शिवाय सिंग यांच्यावर शाईफेक करून त्यांनी पळ काढला. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पवई येथे राहणारे मनोजकुमार हे सकाळी दहा वाजता सहार येथे कामावर येतात आणि संध्याकाळी सात वाजता घरी निघून जातात. 30 जानेवारी रोजी ते नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात वाजता त्यांच्या कारने घराच्या दिशेने जात असताना कार्गोपासून काही अंतरावर असलेल्या सहार रोडवरील सीपीडब्ल्यूडी इमारतीजवळ ऍक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांची कार अडवली आणि कारच्या काचेवर लाकडी बांबूने मारण्यास सुरुवात केली. हा प्रकार चालू असताना पल्सरवरून आणखी तिघे तेथे आले. त्यांनीदेखील लाकडी बांबू व लोखंडी रॉडने गाडीच्या काचांवर मारण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपींनी सिंग यांना अश्लील शिवीगाळदेखील केली. कारच्या काचा फोडून आरोपींनी सिंग यांनादेखील मारहाण केली. तेव्हा त्यांच्यावर शाईफेकदेखील करण्यात आली.

दरम्यान, बचावासाठी मनोजकुमार यांनी आरडाओरड केल्याने ते ऐकून परिसरातील लोक त्यांच्या मदतीला धावले. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी तेथून काढता पाय घेत पोबारा केला. या हल्ल्यात मनोजकुमार यांच्या हाताला दुखापत झाली. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून विलेपार्ले पोलीस ठाण्यात अज्ञात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.