
झारखंडच्या लातेहार जिल्ह्यात शनिवारी भीषण अपघात झाला. रिक्षा आणि कंटनेरची समोरासमोर धडक होऊन सात जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, चांदवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देढ तांगवा खोऱ्यात हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, रिक्षा चांदवाच्या दिशेने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, रिक्षामधील अनेक जण थेट कंटेनरखाली चिरडले गेले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केले. पोलीस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत.


























































