
लोकशाहीर अमर शेख आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सहकारी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील ज्येष्ठ शाहिरा केशर जैनू चांद यांचे सोमवारी पहाटे सातरस्ता येथील घरी निधन झाले. त्या 78 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा शाहीर निशांत, सून, नातवंडे असा परिवार आहे.
केशर जैनू चांद यांनी पती शाहीर जैनू चांद यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, गिरणी कामगारांच्या चळवळीत सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले आहे. अलिकडेच लोकशाहीर अमर शेख यांच्या स्मृतिदिनी दलित पँथर सुवर्ण महोत्सव समितीतर्फे त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनामुळे पुरोगामी, समतावादी सांस्कृतिक चळवळीचा दुवा निखळला असल्याची भावना व्यक्त होत आहे.























































