
आज देशात चित्र बदलते आहे. काही शक्ती देशाला 50 वर्षे मागे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जात-धर्म यावरून सामान्य लोकांमध्ये संघर्ष निर्माण केला जात आहे. ज्या राजकीय पक्षाच्या हातात देशाची सत्ता आहे तो पक्ष सत्तेचा उपयोग कष्टकऱयांसाठी आणि समाजातील लहान घटकांसाठी न करता जातीच्या आणि धर्माच्या नावाने समाजात तेढ निर्माण करण्यासाठी करत आहे, अशा शब्दांत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला.
हमाल माथाडी महामंडळाचे 21 वे राज्य अधिवेशन नगर येथे झाले. या अधिवेशनात शरद पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते डॉ. बाबा आढाव होते. यावेळी शरद पवार यांनी विविध मुद्दय़ांवरून केंद्रातील मोदी सरकारची पिसे काढली. नगर जिल्हा हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून शेवगावात तणाव आहे. शहरातील बाजारपेठ तीन दिवस बंद आहे. काही शक्तींकडून जातीजातीत अंतर वाढवले जात आहे. संघर्ष निर्माण केला जात आहे. दंगली घडवल्या जात आहेत. अशा शक्तींशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. हा संघर्ष केला नाही तर कष्ट करणारे हमाल, कामगार यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली.
हमाल माथाडी कायदा कमकुवत करण्याचा भाजपचा प्रयत्न
z कष्टकरी, हमाल माथाडी यांच्या संरक्षणासाठी अनेक नवीन कायदे आम्ही केले. ज्या कायद्यामुळे कष्टकऱयांना संरक्षण मिळत होते, अशा कायद्यांवरच हल्ला करण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोप शरद पवार यांनी केला. माथाडी हमाल कायदा हा देशात प्रथम महाराष्ट्रात लागू झाला. या कायद्याने कष्टकऱयांना सन्मानाने जगण्याची हमी दिली, मात्र आता काही जणांना माथाडी कायदा खुपतोय. संपत्ती निर्माण करण्याचा व ती जवळ ठेवण्याचा अधिकार केवळ आमचा आहे व कष्टकऱयांनी केवळ कष्टच करत राहावे, अशी काही मालक वर्गाची आता मानसिकता बनत आहे. त्यामुळे माथाडी कामगार कायद्यावर हल्ले केले जात आहेत, मात्र हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. त्याविरोधात कष्टकऱयांना एकजूट करावीच लागेल, अशी साद शरद पवार यांनी घातली.
कर्नाटकात जे होऊ शकते ते अन्य राज्यांत का नाही?
शनिवारी मी बंगळुरूला होतो. तिथे काँग्रेसचे राज्य आले आहे. तिथे अनेक वर्षे ज्या लोकांचे राज्य होते त्यांनी माणसांमध्ये द्वेष वाढण्याचे काम केले. तरीही कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी जिंकणार, असे दावे केले गेले. ते फोल ठरले आणि समाजातील एक लहान वर्गातील, धनगर समाजातील माणूस तिथे मुख्यमंत्री बनला. कष्टकरी लोकांची आणि लहान घटकांची एकजूट झाल्यानेच हे घडू शकले. अशी एकजूट कर्नाटक दाखवू शकते तर देशातील अन्य राज्यांत हे का घडू शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.





























































