
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. आता या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पक्षाचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी वरिष्ठ नेते शशी थरूर यांचा 6,825 मतांनी पराभव केला आहे. खरगे यांना 7,897 मते मिळाली. तर थरूर यांनी 1,072 मते मिळाली. काँग्रेसचे निवडणूक प्रमुख मधुसुदन मिस्त्री यांनी खरगे यांना विजयी घोषित केले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर शशी थरुर यांनी प्रतक्रिया दिली आहे.
पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकर्जुन खरगे यांचा विजय झाला आहे. आपण त्यांना शुभेच्छा देतो, असे थरुर यांनी म्हटले आहे. पक्षाच्या निवडणुकीत प्रतिनिधींचा निर्णय महत्त्वाचा असतो. आपण त्यांच्या निर्णयाचा आदर करत पराभव स्वीकारत आहोत, असे त्यांनी सांगितले. आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाचा अध्यक्ष कोण असावा, हे निवडण्याचे स्वातंत्र्य देणाऱ्या पक्षाचे सदस्य असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचेही ते म्हणाले.
या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींनाही त्यांनी धन्यवाद दिले आहेत. पक्षात निवडणूका घेण्याचा सोनिया गांधी यांचा निर्णय ऐतिहासिक होता, या निवडणुकीमुळे पक्षाला बळकटी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेत सहभागी होत पक्षातील बदल आणि त्यावर चर्चेसाठी सर्वांना प्ररीत केल्याचेही ते म्हणाले.




























































