
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात शिंदे गटाच्या प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी भररस्त्यात गोळीबार केला. सोमवारी रात्री ही घटना घडली. हल्लेखोरांचा नेम चुकल्याने कहाणे यांचा जीव वाचला, मात्र या घटनेने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास गोंधवणी परिसरातून प्रशांत कहाणे आपल्या कार मधून जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर थेट गोळी झाडली. या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी, भररस्त्यातील हल्ले, खून, गोळीबार आणि दहशतीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तर थेट सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यावरच गोळीबार होत असेल तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

























































