ओरिजिनल गद्दारांना मंत्रिपद नाहीच! आदित्य ठाकरे यांचा हल्ला

सध्याची स्थिती पाहता ‘ओरिजिनल गद्दार बॅच’ला कधीही मंत्रिपद मिळणार नाही याचे स्पष्ट संकेत शिवसेनेशी गद्दारी केलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते, असा सणसणीत टोला आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. जनतेला, त्यांच्या समस्यांसोबत वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाकडून घटनाबाह्य सरकारचा निषेध करण्यात आला.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी घटनाबाह्य सरकारचा जोरदार निषेध केला. ‘घटनाबाह्य कलंकित सरकारचा धिक्कार असो’ असा फलक यावेळी झळकवण्यात आला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मिंधे गटाचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, सभागृहात आज ओरिजनल गद्दारांची जी बॅच होती, त्यांचे चेहरे मी पाहिले. त्यानंतर गद्दारांच्या या ओरिजनल बॅचला कधीही मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. ज्या मंत्रिपदासाठी त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, ते त्यांना केव्हाच मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. पालिकेतील घोटाळय़ाबाबत बोलताना ते म्हणाले की, मी विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, ही समिती निष्पक्ष असेल का, हा मोठाच प्रश्न आहे. या समितीत कोण कोण असणार हेदेखील अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी तर ही समिती नेमली नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो.

सीएम म्हणजे करप्ट मॅन

महाराष्ट्रात सीएम या शब्दाचा अर्थ आहे ‘करप्ट मॅन’. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कंत्राटदार मित्रांसाठी काम करत आहेत. जनतेच्या कष्टाच्या पैशाचा वापर बेकायदेशीर आणि अनैतिक सरकारमधील कंत्राटदार मित्राच्या फायद्यासाठी नियम डावलून केला जात आहे. त्यामुळे या घोटाळय़ांची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे.