किलीट तोमय्यांना शिवसैनिकांनी पायरी दाखवली; नुसत्या हूलमध्येच खाली पडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाट्टेल ते बेताल आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुण्यात शिवसैनिकांनी त्यांची पायरी दाखवली. भ्रष्टाचाराविरुद्धच्या तक्रारींची शेखी मिरवत महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी आलेल्या सोमय्या यांना शिवसैनिकांनी रोखले. ‘तुम्ही केवळ विरोधी पक्षांतील नेत्यांनाच लक्ष्य करता, महापालिकेतील भाजपच्या भ्रष्टाराचारावर तुम्ही का बोलत नाहीत’, असा शिवसैनिकांनी जाब विचारला आणि जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सोमय्या गाडीच्या दिशेने  पळाले आणि पायरीवरच पडले. पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना उचलून गाडीत बसवून पालिकेच्या बाहेर नेले.

गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे किरीट सोमय्या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने बेताल आरोप करत आहेत. भ्रष्टाचाराविरुद्धची शेखी मिरवत पुणे महापालिका आयुक्तांना भेटण्यासाठी किरीट सोमय्या हे शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता महापालिकेत आले. सोमय्या महापालिकेत येणार असल्याची माहिती शिवसैनिकांना कळताच शिवसैनिक हजर झाले. सोमय्या गाडीतून उतरून आयुक्तांना भेटण्यासाठी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने जात असतानाच शिवसैनिकांनी त्यांना अडवत ‘तुम्ही पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाहीत, भाजपच्या भ्रष्टाचारावर का गप्प बसता’, असा जाब विचारला. याच वेळी नव्या प्रशासकीय इमारतीकडून काही शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वाराजवळ आले.

शिवसैनिकांनी पुणे महापालिकेतील भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे आणि निवेदन आणले होते. हे निवेदन सोमय्या यांना देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला. मात्र, सोमय्या यांनी निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सोमय्यांना घेराव घातला. संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने सोमय्यांनी गाडीच्या दिशेने धाव घेतली. संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहताच सोमय्या यांनी तेथून पळ काढला. यावेळी जोरात पळताना सोमय्या यांचा तोल गेला आणि ते गर्दीत पायरीवर खाली पडले. पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना गर्दीतून बाहेर काढत गाडीत बसविले.

भाजपच्या घरामध्ये म्हणजेच पुणे महापालिकेत होत असलेला भ्रष्टाचार सोमय्या यांच्या निदर्शनास आणून द्यायचा होता. याबाबत शिवसैनिक त्यांना शांततेत निवेदन देणार होते. मात्र, त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. त्यांच्याबरोबर असलेले भाजपचे पदाधिकारी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. यात महिला आघाडीच्या कार्यकर्त्या जखमी झाल्या आहेत. यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहेत. गर्दीत सोमय्या यांना केंद्रीय राखीव पोलिसांनी मागे खेचले. यावेळी सोमय्या यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. त्यांना शिवसैनिकांनी कुठलीही धक्काबुक्की केली नाही, असे शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

उपचारासाठी रुग्णालयात, मुका मार लागला

पालिकेतून बाहेर पडल्यानंतर सोमय्या यांना संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सोमय्या हे घाबरल्यामुळे त्यांचा ब्लडप्रेशर वाढला होता. परंतु, आता त्यांचा ब्लडप्रेशर नॉर्मल झाला आहे. त्यांना फ्रॅक्चर झालेले नाही. मुका मार लागला आहे. उद्या सकाळपर्यंत त्यांना रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात येईल आणि त्यानंतर डिस्चार्ज देण्यात येईल, असे डॉ. पराग संचेती यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन सोमय्या यांची भेट घेतली.