बाबांनो, आत्महत्या करु नका, जीव गमावू नका, वेळ आलीच तर शिवसेनेला हाक द्या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
वरवट येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी हितगूज साधतांना आदित्य ठाकरे.

सामना प्रतिनिधी । नांदेड

अवेळी पडलेला पाऊस, पिकांची बिकट परिस्थिती, कर्जमाफीची कागदावरच राहीलेली घोषणा यामुळे हताश झालेल्या माझ्या शेतकरी राजाला धीर देण्यासाठी मी आज येथे आलो आहे. तुम्हा सर्वांना माझे नम्रपणे एकच सांगणे आहे की, बाबांनो आत्महत्या करु नका. आपला जीव विनाकारण गमावू नका, तशी वेळ आलीच तर शिवसेनेच्या या भागातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिकांना आवाज द्या, ते तुमच्या दु:खाचे निवारण करतील, अशी कळकळीची विनंती शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरवट आणि नवरदेववाडी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना केली.

ते पुढे म्हणाले की, शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे, जो सामाजिक बांधिलकी समोर ठेवून काम करतोय, कोणताही पक्ष, समाज, जात, धर्म असा विचार न करता गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय. त्यामुळे तुम्हा सर्वांना धीर देण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी मी येथे आलो आहे.

शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मतदारसंघातील नवरदेववाडी या गावाला स्वातंत्र्य काळापासून रस्ताच नव्हता, मात्र आमदार नागेश पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्याचे भूमिपुजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. या गावातील जवळपास वीस ते पंचवीस कुटुंबियांना एकत्रित संवाद साधून त्यांनी सर्वांना धीर दिला. त्यानंतर वरवट येथे शेतकऱ्यांच्या संवादात अगदी जमिनीवर बसून त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. नेमकी काय परिस्थिती आहे, सध्या रब्बीच्या पिकाची काय अवस्था आहे, शासनाची मदत मिळते का, कर्जमाफी मिळाली का, घर प्रपंच कसा चालवताय, अशी आपुलकीने विचारपूस करताच शेतकरी भारावून गेले. यावेळी शेतकरी म्हणाले की, सरकारने कर्जमाफीची घोषणा करताच आम्ही खूष झालो खरे, मात्र ही कर्जमाफी फक्त कागदावरच राहिली. प्रमाणपत्र मिळाली, मोठा गाजावाजा झाला. मात्र हातात काहीच पडले नाही. यामुळे जगायचे कसे असा प्रश्न आम्हाला निर्माण झाला आहे.

आदित्य ठाकरे यांनी वरवट गावातीलच महिलांशीही संवाद साधला. त्यावेळी या महिलांनीही शेतीतील उत्पादन खूपच कमी झाले, त्यात ऑक्टोबरपासून पाऊस नाही, अशा व्यथा व्यक्त केल्या. त्यानंतर सर्वांशी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी निश्चितच मदतीला धावतो. जो अडचणीत आहे, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या समाजाचा आहे याचा विचार आम्ही करीत नाही. नडलेल्यांना मदत करणे आणि त्याच्या मदतीशी धावून जाणे अशी वागणूक आम्हाला शिवसेनाप्रमुखांनी शिकविली आहे. त्यामुळे घाबरुन जावू नका. संतापून जावू नका आणि निराश होवू नका. आत्महत्या करु नका. तुमच्या मदतीसाठी आम्ही धावून आलो आहोत. जनावरांना चारा व प्रसंगी लागणारी मदत देण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यानंतर वरवट येथील प्राथमिक शाळेत जावून त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज साधले. शाळेतील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप आदित्य ठाकरे यांनी केले. विद्यार्थ्यांशी बोलताना तुम्हाला पुढे काय व्हायचंय या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी कोणाला पोलीस व्हायचंय, कुणाला आर्मीत जायचंय अशी उत्तरे दिली. वा तुमच्या इच्छा प्रबळ आहेत तुम्हाला शुभेच्छा देतो असे सांगून आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी आमदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील यांनी या भागातील विविध प्रश्नांचा उलगडा करुन या समस्या सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करु असे आश्वासित केले. सर्वच गावकऱ्यांनी इसापूरच्या उजव्या कालव्याचे काम तातडीने सुरु करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि आमदारांना आग्रह धरला. हे काम काही दिवसातच मार्गी लावू यासाठी मंत्रालयात आम्ही पाठपुरावा करु, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले.