दावोस दौऱ्याला दहा दिवस उलटले, जमाखर्च कुठेय? आदित्य ठाकरेंचा पुन्हा मिंधे सरकारवर हल्ला

दावोस दौऱ्याला दहा दिवस उलटले तरी मिंधे सरकारने अद्याप त्या दौऱ्यातून राज्यात जमा काय झाले आणि खर्च किती केले याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी याबद्दल पुन्हा एकदा सरकारवर हल्ला चढवला असून तीन मुद्यांबाबत जाब विचारला आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यासंदर्भात ट्विटरवर ट्विट केले आहे.  ‘घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या दावोसच्या दौऱ्याला दहा दिवस होत आले. 1) अद्याप मुख्यमंत्र्यांच्या तेथील बैठकांची कोणतीही माहिती फोटो समोर आलेले नाहीत. 2) आकडे फुगवून सांगण्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही . 3) दावोसमधला खर्च व तिथून मिळालेल्या करारांबाबत कोणतीही स्पष्टता नाही’ असे पहिले ट्विट त्यांनी केले आहे.

‘या घटनाबाह्य सरकारमध्ये असलेला गोंधळ पाहता आपण गुंतवणूकदारांना कोणता संदेश देत आहोत? इतर राज्यांचे मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन कोटय़वधींची गुंतवणूक घेऊन जात आहेत आणि आपले मुख्यमंत्री दावोसला जाऊन 40 कोटी व 28 तास खर्च करतात. मात्र त्या दौऱ्याबाबच जनतेला काहीच माहिती मिळत नाही’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.