लोकशाही, संविधानाची तिरडी बांधणाऱ्या निकालाची जाहीर चिरफाड; 16 जानेवारीला उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेसंदर्भात दिलेल्या निकालाची चिरफाड करणारी महापत्रकार परिषद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत. 16 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता वरळीतील डोम सभागृहात ही पत्रकार परिषद होईल, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. देशाच्या इतिहासात अशी खुली पत्रकार परिषद प्रथमच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे घेणार असल्याचेही ते म्हणाले. रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात संताप आणि चीड आहे. ठिकठिकाणी विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत, त्यांना तिरडीवर टाकून अंत्ययात्रा काढल्या जात आहेत. ही लोकशाहीची अंत्ययात्रा असून विधानसभा अध्यक्षांनी राज्यघटना वधस्तंभावर चढवण्याची भावना लोकांच्या मनामध्ये आहे. अत्यंत खोटेपणाचा कळस हा निकाल आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी चढवला.

‘हिम्मत असेल तर पक्ष चोरण्यापेक्षा…..’, संजय राऊत यांचे मिध्यांना आव्हान

महाराष्ट्रात याआधी कधीही विधानसभेच्या अध्यक्षांची अंत्यरात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्षपद हे संविधानीक पद आहे. या पदावरील व्यक्ती कधी पक्षपाती नसते, ती निष्पक्ष असते. पण राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. विधानसभा अध्यक्षांची अंत्ययात्रा का निघतेय? त्यांना तिकडीवर टाकून लोकं स्मशानाकडे का निघाले आहेत? हे चित्र महाराष्ट्राला शोभणारे नसले तरी हे का घडतंय आणि त्यांनी दिलेल्या निकालाची चिरफाड करणारी पत्रकार परिषद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात घेणार आहेत, अशी माहिती खासदार राऊत यांनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

16 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता वरळीच्या डोम सभागृहात पत्रकार परिषद होणार आहे. या सभागृहात अनेक मान्यवर, कायदेतज्ज्ञ उपस्थित असतील. या पत्रकार परिषदेसाठी जनतेलाही आमंत्रण देण्यात आले आहे. जनतेच्याच न्यायालयात या निकालाची चिरफाड होईल. देशाच्या इतिहासामध्ये अशी खुली पत्रकार परिषद प्रथमच महाराष्ट्रात उद्धव ठाकरे घेत आहेत, असेही राऊत म्हणाले.