
भारतीय विमा कर्मचारी सेनेने रचला इतिहास, न्यू इंडिया म्युच्युअल बेनिफिट सोसायटीच्या निवडणुकीत दणदणीत विजय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणीत भारतीय विमा कर्मचारी सेनेने विमा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर भगवी पताका फडकवली आहे. इतर मातब्बर संघटनांची गेल्या 64 वर्षांची सत्ता उलथवून टाकत विमा कर्मचारी सेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यू इंडिया म्युच्युअल बेनिफिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विमा कर्मचारी सेनेचे पॅनल विक्रमी मतांनी निवडून आले आहे. संघटनेचे तीन शिलेदार प्रथमच विश्वस्तपदी विराजमान झाले आहेत.
न्यू इंडिया म्युच्युअल बेनिफीट सोसायटीवर गेल्या सहा दशकांहून अधिक काळ विमा उद्योगातील अन्य संघटनांचे प्राबल्य होते. भारतीय विमा कर्मचारी सेना या संस्थेच्या विश्वस्तपदाची निवडणूक गेली 25 वर्षे लढत असून यावेळी मात्र नवा इतिहास रचला गेला आहे. यंदाच्या पंचवार्षिक (2022 ते 2027 या वर्षांसाठी) निवडणुकीत विमा कर्मचारी सेना पूर्ण ताकदीने उतरली आणि त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरातील ‘न्यू इंडिया’च्या तब्बल 13 हजार कर्मचाऱ्यांनी विमा कर्मचारी सेनेच्या पॅनलला मतदान केले. या भरघोस मतदानाच्या जोरावरच भारतीय विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, अजय गोयजी आणि अजय पथरोड विक्रमी मतांनी विजयी झाले व विश्वस्तपदावर विराजमान झाले.
लाट भगव्याचीच
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी 23 जानेवारी 1996 रोजी स्थापन झालेल्या भारतीय विमा कर्मचारी सेनेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची निवडणूक लढवण्यात आली. विमा कर्मचारी सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सरचिटणीस दिनेश बोभाटे यांच्या नेतृत्वाखाली देशातील 26 राज्यांत नियोजनबद्धपणे प्रचार केला. ‘न्यू इंडिया’च्या कार्यालयांत जाऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधत संघटनेची भूमिका आणि भविष्यातील योजना यांविषयी माहिती देण्यात आली. त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला व सर्व कर्मचारी वर्गाने भारतीय विमा कर्मचारी सेनेच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत विरोधकांची सत्ता उलथवून टाकली. विशेष म्हणजे, सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या ‘चेक ऑफ’ निवडणुकीमध्ये 51 टक्के कर्मचाऱ्यांचा काwल मिळवून संपूर्ण हिंदुस्थानातील विमा क्षेत्रातील सर्वात बलाढय़ मान्यताप्राप्त संघटना (युनियन) म्हणून भारतीय विमा कर्मचारी सेनेने झेंडा रोवला होता. त्यानंतर आज पुन्हा भारतीय विमा कर्मचारी सेनेने हा दणदणीत विजय मिळवल्याने देशभरात विमा क्षेत्रात शिवसेनेच्या भगव्याची लाट असल्याची बाब अधोरेखित झाले आहे.
हा विजय ऐतिहासिक!
भारतीय विमा कर्मचारी सेना विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा पह्डून त्यावर सातत्याने लढा देत आली आहे. संघटनेच्या अविरत प्रयत्नांमुळे दुसऱ्या पेन्शनचा हक्क कर्मचाऱ्यांना मिळू शकला. गेली दहा वर्षे वेतनवाढीपासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आले. त्याविरोधात संघटनेने आवाज उठवला. पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि वित्त विभागाकडे मी सातत्याने याबाबत पाठपुरावा केला. विमा उद्योगात वेतनवाढ द्यायचीच नाही, असे धोरण आणले जात होते. मात्र, त्याविरोधात दंड थोपटले. मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा मोठय़ा शहरांसह छोटय़ा शहरांपर्यंत कर्मचाऱ्यांच्या भावनांना वाचा पह्डण्याचे काम आम्ही केले. या रेटय़ामुळेच वेतनवाढीचा करार मान्य करावा लागला आणि कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळाली. वेतनवाढ मिळणारच नाही, अशी आवई उठवणाऱ्यांची तोंडे त्यामुळे बंद झाली. विमा क्षेत्रातील खासगीकरणाचे वारेही विमा कर्मचारी सेनेमुळेच थोपवले गेले. सर्वसाधारण विमा उद्योगात अशा धडाकेबाज कामगिरीमुळेच शिवसेनाप्रणित भारतीय विमा कर्मचारी सेनेचे निर्विवाद वर्चस्व निर्माण झाले असून आजचा विजय ऐतिहासिक असल्याची भावना शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केली.






























































