सिद्धगंगा मठाचे मठाधिपती लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवकुमार स्वामी यांचे देहावसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बंगळुरू

सिद्धगंगा मठाचे मठाधिपती  तसेच लिंगायत धर्मगुरू डॉ. शिवकुमार स्वामी यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 111 वर्षांचे होते. मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजता त्यांचा समाधी सोहळा होणार आहे. दरम्यान, स्वामींच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे.

शिवकुमार स्वामी हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी 11.44 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला,  स्वामींच्या निधनामुळे कर्नाटकात  मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुटी देण्यात आली आहे.  त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान,  मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी तीक्र दुःख व्यक्त केले आहे.

स्वामी यांनी मठाधिपती झाल्यानंतर सर्वात प्रथम आरोग्य व शिक्षणाच्या क्षेत्रात काम सुरू केले. मठातर्फे संस्कृत पाठशाळा सुरू केल्या. पण त्याचबरोबर आधुनिक शिक्षण देणारे अभ्यासक्रमही सुरू केले. आज मठाच्या वतीने 120 शैक्षणिक संस्था चालवल्या जातात. सिद्धगंगा शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत भोजन देण्यात येते. त्याचबरोबर वसतिगृहाचीही सोय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली.

राजकारणावर मोठा प्रभाव

बंगळुरूपासून 70 किमी अंतरावर तुमकूर येथे असलेला सिद्धगंगा मठ हा 300 वर्षे जुना असून लिंगायत समाजाचा सर्वात मोठा मठ आहे. कर्नाटकात जवळपास 18 टक्के लिंगायत समाज असून गेल्या अनेक वर्षांपासून कर्नाटकातील राजकारणावर या मठाचा प्रभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर राजकीय नेत्यांनी सिद्धगंगा मठाला भेट देऊन मठाधिपती शिवकुमार स्वामी यांचे आशीर्वाद घेतले आहेत.